कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांची माहिती
अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
नवी मुंबई, 3 जून 2025
कोकण रेल्वे मार्गावर पावसाळापूर्व कामे पूर्ण करण्यात आली असून रेल्वे सेवा सुरळीत रहावी यासाठी कोकण रेल्वे सज्ज झाली असल्याची माहिती कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांनी आज नवी मुंबईतल्या बेलापूर इथल्या मुख्यालयात पत्रकार परिषदेत दिली.
डोंगराळ भागातून जाणाऱ्या कोकण रेल्वे मार्गावर पावसाळ्यात दरडी कोसळण्याच्या घटना घडत होत्या. मात्र कोकण रेल्वे प्रशासनाने सातत्याने संभाव्य दरडी कोसळण्याच्या ठिकाणी कामं करून ही समस्या दूर केली आहे. संवेदनशील भाग असलेल्या 636 प्रशिक्षित कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. वीर, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, वेर्णा या स्थानकांवर रेल्वे मेंटेनंन्स व्हॅन ठेवण्यात आली आहे. तर माणगाव, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, करमाली, कारवार, उडूपी या स्थानकांवर टॉवर व्हॅगन ठेवण्यात आली आहे, असे झा यांनी सांगितले.
मुसळधार पाऊस आ़णि कमी दृश्यमान असताना 40 किलोमीटरचा वेग ठेवण्याच्या सूचना पायलटला देण्यात आल्या आहेत. सर्व स्थानकांवर ट्रेन क्रू आणि स्टेशन मास्तर यादरम्यान संपर्क साधण्याकरिता अत्याधुनिक प्रणाली असलेला वीएचएफ सेट देण्यात आला आहे. तसंच आपत्कालीन परिस्थितीत कंट्रोल रूमशी मेंटेनन्स स़्टाफशी संपर्क साधण्यासाठी ईएमएस प्रणाली विकसित करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
कोकण रेल्वे मार्गावर 10 जून ते 31 ऑक्टोबर या कालावधीत मॉन्सून वेळापत्रक जाहीर केलं जातं .मात्र यंदा मान्सून काळात केल्या जाणाऱ्या सर्व उपाययोजना पूर्ण झाल्याने या वेळापत्रकात 15 दिवसांची कपात करून 15 जून ते 20 ऑक्टोबर या कालावधीत मॉन्सून वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.
कोकण रेल्वे मार्गावरील सर्व स्थानकांवर नागरिकांच्या सोयीसाठी विविध उपाययोजना करण्यात येत असून आगामी तीन वर्षांत रेल्वे स्थानकांवर मुलभूत सर्व सुविधा उपलब्ध असतील, असा विश्वास झा यांनी व्यक्त केला.
कोकण रेल्वे मार्गावर रोरो सेवेच्या माध्यमातून मालवाहून नेणाऱ्या ट्रकची वाहतूक करण्यात येते. अशाचप्रकारे खासगी प्रवासी वाहनांचीही वाहतूक करता येऊ शकेल का, याचा विचार सुरु असून आगामी गणेशोत्सव काळात याबाबत चाचपणी करण्याचा विचार असल्याचेही झा यांनी यावेळी सांगितलं.
========================================================
======================================================