ठाण्‍यात सुरु होणार इलेक्ट्रीक वाहन चार्जिंग स्टेशन

प्रकल्प राबविणारी देशातील पहिली महानगरपालिका

ठाणे, 9 मे 2017/AV News Bureau:

शहरातील वाहतुकीमुळे होणारे प्रदुषण कमी करण्‍यासाठी इलेक्ट्रीक वाहनांचा वापर वाढविण्यासाठी ठाणे महापालिका प्रयत्न करीत असून अशा वाहनांसाठी शहरात विविध ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभे करण्‍याबाबत सर्वेक्षण सुरु करण्‍यात येणार आहे. याबाबत आज महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्‍या सोबत आंतरराष्‍ट्रीय नाणेनिधीच्या प्रतिनिधींची बैठक होऊन लवकरात लवकर या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्‍याबाबत निर्णय झाला. अशा पध्‍दतीचा प्रकल्प राबविणारी ठाणे महानगरपालिका ही देशातील पहिली महानगरपालिका आहे.

आंतरराष्‍ट्रीय नाणेनिधीच्‍या सहकार्याने हा प्रकल्प राबविण्यात येत असून पेट्रोल पंपाच्‍या धर्तीवर शहरात विविध ठिकाणी इलेक्ट्रीक वाहन चार्जिंग स्टेशन्स उभे करण्‍यात येणार आहेत.  ही चार्जिंग स्टेशन्स कुठे उभा करता येतील याबाबत सर्वेक्षण सुरु करण्‍यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिली.

अर्बन रिसर्च सेंटर येथे आज झालेल्‍या या बैठकीत महापालिकेचे सल्‍लागार शरद पुस्तके, आंतरराष्‍ट्रीय नाणेनिधीचे सुवर्नील मुजुमदार, विद्युत विभागाचे उपनगर अभियंता सुनील पोटे, शहर व नियोजन अधिकारी प्रमोद निंबाळकर,  डेलॉईट या कंपनीचे पार्टनर प्रानावत, वरिष्ठ प्रबंधक अमिताभ शहा, सुमित मिश्रा, मुख्‍्य संशोधन अधिकारी सुजया राणे आदी उपस्थित होते.