बुधवारी ठाण्यातील काही भागातील पाणीपुरवठा बंद

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • ठाणे, 18 डिसेंबर 2023

 ठाणे महानगरपालिकेला मे. स्टेम प्राधिकरणाकडून होणाऱ्या पाणीपुरवठा योजनेमधील दैनंदिन देखभाल दुरूस्तीची महत्वाची कामे करण्याकरिता बुधवार दिनांक  20 डिसेंबर रोजी रोजी सकाळी 9 ते गुरूवार दिनांक 21 डिसेंबर रोजी  रोजी सकाळी 9 पर्यत असा 24 तासांचा शटडाऊन घेण्यात येणार असल्याने पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तथापि ठाणे महानगरपालिकेच्या स्वत:च्या पाणी पुरवठा योजनेचे नियोजन करुन टप्प्याटप्प्याने ठाणे शहरात एक वेळ पाणी पुरवठा सुरू ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कंपाऊंड, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ, आनंदनगर, कासारवडवली, ओवळा इत्यादी ठिकाणाचा पाणीपुरवठा बुधवार,20 डिसेंबर रोजी  सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यत बंद राहील व समतानगर, ऋतुपार्क, सिद्धेश्वर, इटर्निटी, जॉन्सन, जेल, साकेत, उथळसर, रेतीबंदर, कळव्याचा व मुंब्र्याचा काही भागात बुधवारी रात्री 9 ते गुरूवार सकाळी 9 पर्यत पाणीपुरवठा बंद राहील, अशा रितीने टप्प्याटप्प्याने एक वेळ पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

वरील शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यत पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्‌य तो साठा करुन ठेवावा व ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

========================================================

 

========================================================