एसटी भरतीत माझाही वशिला चालणार नाही

परिवहनमंत्री दिवाकर रावते

29 जून 2017/AV News Bureau:

2 जुलै रोजी होणाऱ्या एसटीच्या चालक तथा वाहकपदाच्या लेखी परीक्षेत व त्यानंतरच्या भरतीप्रक्रियेत माझ्यासह कोणाचाही वशिला चालणार नाही. संपूर्ण भरतीप्रक्रिया अत्यंत पारदर्शक होणार आहे. लेखी परीक्षेनंतर होणारी चालकत्वाची (वाहन चालन चाचणी) चाचणी संगणकीय व मानवहस्तक्षेपरहित असणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी कोणत्याही प्रकारच्या आर्थिक देवाण-घेवाणीमध्ये अडकू नये, असे आवाहन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केले आहे.

कोकणातील  7929 इतक्या चालक तथा वाहक पदासाठी 2 जुलैला लेखी परीक्षा होत आहे. या परीक्षेसाठी 28314 उमेदवार पात्र झाले असून पालघर, ठाणे,मुंबई,रायगड,रत्नागिरी व सिंधुदूर्ग या जिल्ह्यातील विविध 27 केंद्रावर ही परीक्षा होणार आहे. ही परीक्षा वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाची असून उमेदवारांना  परीक्षा झाल्यानंतर स्वत:च्या उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत सोबत घेऊन जाता येणार आहे.