‘क्रुझ पर्यटन’ मुंबईची नवी ओळख

  • वर्षाला 950 क्रुझ आणि 40 लाख पर्यटक मुंबईत येणार

मुंबई, 11 जानेवारी 2018/ avirat vaatchal news:

क्रुझ पर्यटनाला मुंबईत मोठा वाव आहे. सध्या मुंबईत दरवर्षी फक्त ८० क्रुझ येतात. त्यातून फक्त २ लाख पर्यटक येतात. भविष्यात ही संख्या वार्षिक साधारण 950 क्रुझेस आणि 40 लाख पर्यटकांपर्यंत वाढविण्याचे आमचे ध्येय आहे. त्यासाठीच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रुझ टर्मिनलचे काम करण्यात येत आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण करुन महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या विकासात महत्वाचे योगदान दिले जाईल असा विश्वास केंद्रीय जहाज आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

मुंबई पोर्ट ट्रस्ट येथे नवीन आंतरराष्ट्रीय क्रुझ टर्मिनलचे आज मुख्यमंत्री फडणवीस व केंद्रीय जहाज आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल, खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, आमदार राज पुरोहीत, आशिष शेलार, मुंबई पोर्ट ट्रस्ट अध्यक्ष संजय भाटिया, उपाध्यक्ष यशोधन वनगे आदी उपस्थित होते. यावेळीकोचीन शीप यार्ड आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट यांच्यामध्ये जहाज दुरुस्तीबाबत सामंजस्य करार करण्यात आला

आपल्या भाषणात गडकरी यांनी सांगितले की, सागरमाला प्रकल्पांतर्गत महाराष्ट्राला मोठा लाभ मिळत आहे. या प्रकल्पांतर्गत २.४१ लाख कोटींच्या ८६ प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे. जेएनपीटी मधील सेझ प्रकल्पात मोठी गुंतवणूक येत असून तिथे येत्या काळात दीड लाख नवीन रोजगार निर्माण होतील. यातील ८० ते ९० टक्के रोजगार हे स्थानिकांना देण्यात येतील, असे ते म्हणाले.

मुंबईतील रोरो टर्मिनल चे काम 25 मार्चपर्यंत पूर्ण करण्यात येईल. साधारण एप्रिलपासून ही सेवा सुरू करण्यात येईल. मांडवा, नेरुळ येथे रोरो सेवेच्या माध्यमातून वाहने गेल्यास वेळ आणि इंधनाची बचत होण्याबरोबरच रस्त्यांवरील गर्दी कमी होऊ शकेल. जेएनपीटी येथे सेझच्या माध्यमातून मोठी गुंतवणूक येत आहे. महाराष्ट्राच्या जीडीपी वाढीसाठी याचा फार मोठा लाभ होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

मेट्रोच्या कामातून निघणाऱ्या मातीचा उपयोग करून सागरी भराव तयार करून उद्यान तयार करण्याची सूचना नितीन गडकरी यांनी केली आहे. मुंबईच्या विकास आराखड्यास मान्यता देताना या प्रकल्पाला निश्चित मान्यता देऊ. वेस्टपासून वेल्थ तयार करण्याचा हा अभिनव उपक्रम ठरेल. या प्रकल्पासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टला प्लॅनिंग ॲथोरीटीचे अधिकार देऊ, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

मुंबईला क्रुझ पर्यटानचे होम पोर्ट बनवणार- जयकुमार रावल

भविष्यात राज्याच्या आर्थिक विकासात पर्यटन क्षेत्र महत्वाची भूमिका निभावणार आहे. त्यादृष्टीनेच केंद्र आणि राज्य शासनाच्या एकत्रित सहभागातून पर्यटनविषयक विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. महाराष्ट्राला पर्यटनाचा मोठा वारसा आहे. हा वारसा जागतिक पर्यटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी मुंबईला क्रुझ पर्यटनाचे होम पोर्ट बनविण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी यावेळी दिले.

क्रुज टर्मिनलचा पहिला टप्पा वर्षभरात पूर्ण करणार – संजय भाटीया

मुंबईच्या पूर्व किना-याचा विकास करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पोर्टचा व्यवसाय  क्रुझ पर्यटनाकडे वळविण्यात येत आहे. त्यामध्ये मुंबई पोर्ट ट्रस्टचे 27 प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. 6800 करोड रूपयांचे हे प्रकल्प आहेत. 7 लाख ते 10 लाख पर्यटकांची क्षमता या टर्मिनलमध्ये असणार आहे. या टर्मिनलचा पहिला टप्पा 1 वर्षात पूर्ण होईल असा विश्वास मुंबई पोर्ट ट्रस्ट अध्यक्ष संजय भाटिया यांनी व्यक्त केला.

क्रुझ टर्मिनलची वैशिष्ट्ये

  • अंदाजित किंमत सुमारे ३०० करोड रुपये इतकी असून त्याचे क्षेत्रफळ हे साधारण ४.१५ लाख वर्गफूट इतके असेल.
  • वर्षातील सर्व दिवशी ते कार्यान्वित असेल.
  • जून २०१९ पर्यंत याचे काम पूर्ण करण्याचे उद्दीष्ट आहे.
  • देशातील ८० टक्के क्रुझ प्रवाशांची या टर्मिनलमधून ने-आण करण्यात येईल.
  • तळमजला अधिक तीन मजले असे या टर्मिनलचे स्वरुप असेल. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या टर्मिनलमुळे मुंबईतील आयकॉनिक इमारतींमध्ये अजून एका भव्य इमारतीची भर पडणार आहे.