सर्व सहभागातून नवी मुंबई शहराचे मानांकन उंचावण्याचे ध्येय

नवी मुंबई महापालिका आयुक्त  राजेश नार्वेकर यांचा निर्धार

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, १२ ऑक्टोबर २०२२

नवी मुंबई शहराच्या स्वच्छता व सुंदरतेतील बदल हे दृश्यात्मक स्वरुपात दिसत आहेत. यामध्ये स्वच्छताकर्मी, अधिकारी, कर्मचारी, क्षेत्रीय कर्मचारी त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधी, नागरिक व प्रसारमाध्यमे अशा  सर्वांच्याच सहभागाचा फार मोठा वाटा आहे. “स्वच्छ सर्वेक्षण 2022” मध्ये देशात तृतीय क्रमांकाच्या व राज्यात प्रथम क्रमांकाच्या स्वच्छ शहराचे मानांकन संपादन केल्यामुळे आता शहराविषयी सर्वांच्याच अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे आपली जबाबदारीही वाढली असून  पुढील काळात स्वच्छताविषयक कांमाचा वेग व व्याप्ती वाढवून “निश्चय केला – नंबर पहिला” हे ध्येय साध्य करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करूया, असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी केले आहे.

नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील ॲम्फीथिएटरमध्ये पार पडलेल्या “स्वच्छ सर्वेक्षण 2023 – स्वच्छतेची नवी दिशा” या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले व संजय काकडे, प्रशासन विभागाचे उपआयुक्त नितीन नार्वेकर, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त बाबासाहेब राजळे, शहर अभियंता संजय देसाई, उप आयुक्त दादासाहेब चाबुकस्वार, उप आयुक्त डॉ. अमरिश पटनिगिरे, उपआयुक्त योगेश कडुस्कर तसेच इतर विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

स्वच्छतेमध्ये मानांकन उंचाविण्याचे ध्येय जेव्हा आपण नजरेसमोर ठेवतो तेव्हा त्यामध्ये शहरातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग गरजेचा आहे. नागरिकांकडून दररोज घरातूनच नियमितपणे कच-याचे वर्गीकऱण होणे अपेक्षित असून त्यादृष्टीने स्वच्छतेची मानसिकता तयार करण्याची गरज विषद करीत आयुक्तांनी यासाठी विविध माध्यमांचा वापर करून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जातील असे सांगितले.

“स्वच्छ मंथन 3.0” स्पर्धेच्या दुस-या टप्प्यात सर्वोत्तम कामगिरी करणा-या बेलापूर विभाग कार्यालयास स्वच्छ मंधन स्पर्धेचा फिरता चषक प्रदान करण्यात आला. विशेष म्हणजे हा फिरता चषक पहिल्या टप्प्यात सर्वोत्तम कामगिरी करणा-या वाशी विभागाच्या विभाग अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त दत्तात्रय घनवट यांच्याकडून बेलापूर विभागाच्या विभाग अधिकारी मिताली संचेती यांच्याकडे प्रदान करण्यात आला.

स्वच्छ सर्वेक्षण 2022 मधील यशस्वीतेचा उल्लेख करताना त्यामध्ये सर्वाधिक महत्वाचा वाटा असणा-या स्वच्छताकर्मींचा गौरव करण्याची परंपरा कायम राखीत बेलापूर ते दिघा अशा आठही विभागातील शौचालय स्वच्छतेसाठी महत्वपूर्ण योगदान देणा-या पुरुष व महिला स्वच्छताकर्मींचा महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या शुभहस्ते यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.

‘इंडियन स्वच्छता लीग’ अंतर्गत 22 सप्टेंबर रोजी सेक्टर 10 ए, मिनी सी शोअर, वाशी याठिकाणी लेट्स सेलिब्रेट फिटनेस या संस्थेच्या सहयोगाने 207 तृतीयपंथी नागरिकांच्या सहभागातून राबविण्यात आलेल्या “बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स” मध्ये नोंद झालेल्या विशेष उपक्रमाबद्दल लेट्स सेलिब्रेटच्या प्रमुख रिचा समीत तसेच तृतीयपंथी नागरिक समुहाचे प्रमुख यांचा आयुक्तांच्या शुभहस्ते विशेष सन्मान करण्यात आला.

इंडियन स्वच्छता लीग अंतर्गत ‘युथ वर्सेस गार्बेज’ या टॅगलाईननुसार सीबीडी, बेलापूर येथील राजीव गांधी क्रीडा संकुलात राबविण्यात आलेल्या उपक्रमात उत्तम कामगिरी करणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिका शाळांच्या गटातून नमुंमपा शाळा क्र. 33 पावणे ही शाळा प्रथम क्रमांकाची तसेच शाळा क्रमांक 4 सीबीडी बेलापूर ही शाळा व्दितीय क्रमांकाची मानकरी ठरली. शाळा क्र. 53 चिंचपाडा ऐरोली आणि शाळा क्र. 22 तुर्भे स्टोअर या शाळांना तृतीय क्रमांकाचे पारितोषिक विभागून देण्यात आले.

घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त बाबासाहेब राजळे यांनी ‘स्वच्छ सर्वेक्षण 2022’ मध्ये “देशातील तृतीय क्रमांकाच्या स्वच्छ शहराचा मिळालेला बहुमान”, कचरामुक्त शहराचे “फाईव्ह स्टार मानांकन” प्राप्त करणारे तसेच ओडीएफ कॅटेगरीत सर्वोच्च “वॉटरप्लस” मानांकन मिळविणारे महाराष्ट्र राज्यातील एकमेव शहर या अभिमानास्पद उपलब्धीबद्दल सर्वांचे अभिनंदन करीत यामध्ये योगदान देणा-या सर्व घटकांचे आभार व्यक्त केले.

याप्रसंगी आरंभ क्रिएशन्सच्या कलावंतांनी सादर केलेल्या कचरा वर्गीकरणाविषयक मनोरंजनातून प्रबोधनात्मक पथनाट्याला आयुक्तांसह उपस्थितांनी पसंतीची दाद दिली.