- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, 28 ऑक्टोबर 2026
नवी मुंबई शहरात फॉर्म्युला – 4 कार रेसकरीता ट्रॅक विकसित करण्याबरोबरच संबंधित कामांसाठी तब्बल 40 कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. या श्रीमंती उपक्रमासाठी सुमारे 34 कोटी रुपये खर्चाला आधीच मंजुरी देण्यात आली असली तरी आता जास्तीचे काम दाखवत आणखी सुमारे साडेसात कोटी रुपयांचा वाढीव निधी मंजूर करण्याबाबतचा प्रस्ताव 29 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीसमोर मांडण्यात आला आहे.
विशेष म्हणजे शहरातील पायाभूत सुविधांची दुरवस्था तसेच शहरासमोर पाणी कपातीचे संकट असताना महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी नवी मुंबईकरांच्या करापोटीच्या कोट्यवधी रुपयांचा चुराडा करीत असून निवडून दिलेले लोकप्रतिनिधीदेखील याप्रकरणी गप्प बसल्याचे विदारक चित्र दिसत आहे. त्यामुळे या उपक्रमाचा नेमका फायदा नवी मुंबईकरांना होणार की आणखी कुणाला असा प्रश्न उपस्थित करून नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात पामबीच मार्ग येथे फॉर्मुला-4 (F-4) कार रेस करीता ट्रॅक विकसित करणे व तद्अनुषंगीक कामे करणे आदी कामांसाठी महापालिका प्रशासनाने तब्बल 33 कोटी 79 लाख 71 हजार 363 इतक्या खर्चास 12 डिसेंबर 2025 मध्ये मंजुरी दिलेली आहे. तसेच हे काम करण्यासाठी मे. ए.एम. स्वामी कन्स्ट्रक्शन या कपनीला काम देण्यात आले आहे. मात्र आता डिझाइनमध्ये नव्याने बदल आणि इतर जादाची कामे दाखवून वाढीव खर्चासाठी आणखी 7 कोटी 89 लाख 67 हजार 735 रुपयांचा नवा प्रस्ताव तयार करून तो उद्या होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे. या वाढीव खर्चासह फॉर्म्युला कार रेस ट्रॅकच्या कामाचा एकूण खर्च तब्बल 39 कोटी 83 लाख 27 हजार 979 रुपये इतका प्रचंड वाढला आहे.
क्लिक करा : मानसिकतेविरूध्द कायद्याची साथ महत्त्वाची
या कार रेस ट्रॅकसाठी जनतेच्या तब्बल 40 कोटी रुपयांचा चुराडा कितपत व्यवहार्य आहे, असा प्रश्न नागरिक उपस्थित करू लागले आहेत. मात्र ज्यांना निवडून दिले ते लोकप्रतिनिधीदेखील या मुद्द्यावर गप्प बसल्याचे विदारक चित्र सध्या नवी मुंबईकरांना पहावे लागत आहे.

- फॉर्म्युला कार रेस ट्रॅकमुळे वाहतुकीला अडथळा
फॉर्म्युला कार रेस ट्रॅकच्या कामामुळे सीवूड तसेच पामबीच मार्गावरील वातुकीला अडथळा निर्माण झाला आहे. विशेषतः पाम बीच मार्गावरील बेलापूरच्या दिशेने जाणारा रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे वेगाने येणाऱ्या वाहनांमुळे अपघात होण्याची शक्यता आहे. शिवाय सीवूड येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई येथील रस्त्यांवर मोठाले रस्ते दुभाजक लावण्यात आलेले आहे. त्यामुळेही अपघात होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
========================================================














