पतंगोत्सव जपून साजरा करा

वीजेच्या तारांपासून दूर राहण्याचे महावितरणचे आवाहन

मुंबई,१० जानेवारी २०१७/AV News Bureau :

मकर संक्रातीचा सण जवळ आला असून लहान थोरांना पतंगाचे वेध लागले आहेत. मात्र उत्साहाच्या भरात विजेच्या तारांमध्ये अडकलेला पतंग निष्काळजीपणामुळे काढण्याच्या प्रयत्नात जीवावरही बेतू शकते. त्यामुळे पतंग उडविताना काही दुर्घटना होणार नाही याची सावधगिरी बाळगावी आणि सुरक्षिततेचे नियम पाळूनच पतंग उडवावेत असे आवाहन महावितरणने केले आहे.

शहरी भागात अपुऱ्या जागेअभावी घराच्या छतावर पतंग उडविताना अनेक जण आपल्याला दिसतात. पतंग उडविण्याच्या नादात आपल्या घरावरून गेलेल्या वीजतारांचाही विसर पडतो. कोणतीही खबरदारी न घेतल्यामुळे अपघातही होतो. त्याचबरोबर युवकांच्यात वीजतारांमध्ये अडकलेले पतंग काढण्याचीही जणू स्पंर्धाच लागलेली असते. अशावेळी शॉक लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वीजतारांमध्ये अडकलेले पतंग काढण्याचा प्रयत्न करू नये. वीजतारांमध्ये अडकलेल्या पतंगाचा मांजा खाली जमिनीवर लोंबकळत असतो, हा मांजा ओढून पतंग काढण्याच्या प्रयत्नात एका तारेवर दुसऱ्या तारेचे घर्षण होवून शॉटसर्किट होण्याची शक्यता असते. त्यामुळे संबंधित परिसरात वीजपुरवठा खंडीत होण्याबरोबरच, त्या व्यक्तीचा शॉक लागून प्राणावर बेतू शकते. त्यामुळे संक्राती सारख्या आनंददायी सणाला गालबोट लागू नये याकरिता योग्य खबरदारी घेवून मोकळ्या जागेतच पतंग उडवावेत. तसेच पालकांनी दक्ष राहून मुलांना पतंग उडविण्यासाठी मार्गदर्शन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

  • मदतीसाठी आपतकालीन क्रमांक

तातडीच्या मदतीची संभाव्य गरज लागल्यास, नजीकच्या महावितरणच्या कार्यालयाशी किंवा तसेच  २४X ७ तास सुरु असणाऱ्या कॉल सेंटरच्या १९१२, १८००-२३३-३४३५ आणि १८००-२००-३४३५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे.

  • हे लक्षात ठेवा
  1. विजेच्या तारांवर अडकलेले पतंग काढणे जीवघेणे ठरू शकते.
  2. तारांमध्ये अडकलेला मांजा ओढू नये.
  3. वीजतारा असलेल्या परिसरात पतंग उडविणे टाळा.
  4. तारात अडकलेली पतंग काढण्यासाठी दगडाला दोरा बांधून तारांवर फेकू नये.
  • घातक धातूमिश्रित मांजा

सध्या बाजारात धातूमिश्रित मांजा मिळतो. या मांजावर धातूमिश्रित रसायनाचे कोटिंग केलेले असते असा मांजा वीजेच्या तारेत अडकल्यास त्यामधून वीज प्रवाह पतंग उडविणाऱ्या व्यक्ती पर्यंत पोहचून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत  काळजी घेऊन सर्वांनी सुरक्षितपणे पतंगोत्सव साजरा करवा, असे आवाहन भाडुंप विभागाचे मुख्य अभियंता सतिश करपे यांनी केले आहे.