मुंबई-गोवा महामार्गावर प्रवाशांना सुरक्षा पुरवा

  • भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला वायकरांचे पत्र

अविरत वाटचाल न्यूज

23 एप्रिल 2018,मुंबई :

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे महामार्गावर अभियांत्रिकी कामे सुरू असताना प्रवाशांचा सुरक्षेच्यादृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना तातडीने कराव्यात अशी मागणी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

  • मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. काही ठिकाणी चौपदरीकरणाचे काम संथगतीने सुरू असल्याचे वाहतुकीवर परिणाम होत आहे. एप्रिल – मे महिन्यात मोठ्या प्रमाणात मुंबईहून कोकणात जाणार्‍या व परत येणार्‍या प्रवाशांची संख्या लक्षात घेता त्यांच्या हितासाठी तसेच सुरक्षेसाठी महामार्गावर सुरक्षात्मक उपाययोजना करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. मात्र चौपदरीकरणाचे काम सुरू असतानाही प्रवाशांच्या व स्थानिक जनतेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून आवश्यक त्या उपाययोजना कंत्रादारांनी न केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या महामार्गावर अपघातांच्या संख्येतही वाढ होत असल्याचा आरोप वायकर यांनी केला आहे.

 

  • मागील काही दिवसांमध्ये दिवाणी खवटी तसे चकशेडी घाट येथे २ ते ३ अपघात झाले असून यात काही प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले आहे. तसेच कशेडी घाटात देखील अपघात झाल्याचे पालकमंत्री वायकर यांनी संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. चौपदरीकरणाचे काम सुरू असताना मुंबई-गोवा-मुंबई  प्रवास करणार्‍या प्रवाशांना सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी कंत्रादारांना धोक्याच्या ठिकाणी बॅरिकेट व दिशादर्शक फलक लावावेत आणि आवश्यक त्या अन्य सुचनाफलक लावावेत, अशी सूचना वायकर यांनी पत्राद्वारे केली आहे.