शेतकऱ्यांची देयके सात दिवसांत द्या

turdal

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश

संपूर्ण तूर खरेदी होईपर्यंत खरेदी केंद्रे सुरु ठेवणार

मुंबई, 27 फेब्रुवारी 2017/AV News Bureau :

राज्यात यावर्षी तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले आहे.  शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी नाफेडची अंतर मर्यादेची अट असली तरी खरेदी केंद्रे सर्वत्र सुरू करावीत, शेतकऱ्यांचे देयके सात दिवसाच्या आत द्यावेत. तसेच संपूर्ण तूर खरेदी होईपर्यंत खरेदी केंद्रे सुरू ठेवावी, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.

वर्षा निवासस्थानी किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत सुरु असलेल्या तुर खरेदी संदर्भात  मुख्यमंत्र्यांच्या  उपस्थितीत  बैठक आयोजित करण्यात आली होती.

राज्यात जिथे भारतीय अन्‍न महामंडळाचे खरेदी केंद्र सुरु आहेत. तेथे नाफेडने खरेदी केंद्रे तातडीने सुरु करावीत. गोदामांची क्षमता वाढविण्यासाठी गोदामांचे मॅपिंग करुन ज्या ठिकाणी खासगी गोडावून घेण्याची आवश्यकता आहे, तिथे गोडाऊन घेण्यात यावीत, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

खरेदी केंद्राचा कालावधी वाढविण्यासंदर्भात आणि अंतर वाहतूक करण्याची परवानगी मिळण्यासाठी केंद्र शासनाला प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तसेच वखार महामंडळाने पणन महासंघ, कॉटन फेडरेशन, जिल्हा पुरवठा अधिकारी, आदिवासी विकास महामंडळ, बाजार समिती, सहकारी संस्था यांची गोदामे तूर खरेदी साठवणूकीसाठी घेण्यात येत आहेत, ज्या ठिकाणी बारदाने उपलब्ध नाहीत तेथे बारदाने पुरवठा करण्यात येत असल्याचे पणन मंत्री सुभाष देशमुख  यांनी सांगितले.