शेतकरी कर्जमाफीसाठी गोळ्या झेलायलाही तयार

प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अशोक चव्हाण

वर्धा/नागपूर 30 मार्च 2017/AV News Bureau:

राज्यातील सरकारने शेतक-यांना वा-यावर सोडले आहे, या शेतक-यांना आत्मविश्वास आणि न्याय देण्यासाठी संघर्षयात्रा काढली असून शेतकरी कर्जमाफीसाठी लाठ्या काठ्याच नाही तर गोळ्या झेलायलाही आपण तयार असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

विरोधी पक्षांच्या संयुक्त संघर्ष यात्रेच्या आज दुस-या दिवशी वर्धा जिल्ह्यातील सेलू येथे जाहीर सभेत बोलताना खा. अशोक चव्हाण यांनी राज्य सरकारवर टीका केली.

विरोधी पक्ष गेल्या दोन वर्षांपासून सभागृहात आणि सभागृहाबाहेर रस्त्यावर लढा देतायेत पण राज्यातल्या सरकारमध्ये बसलेल्या लोकांना संवेदनाच राहिल्या नाहीत. भाजप सरकारच्या काळात ब्रिटीश आणि निजामाच्या राजवटीपेक्षा वाईट वेळ शेतक-यावर आली आहे. कर्जमाफीने फक्त बँकांचा फायदा होतो असे मुख्यमंत्री म्हणतात, मग मुख्यमंत्र्यांनी खासगी सावकारांची कर्ज माफ करून कोणाचा फायदा केला ? असा प्रश्न चव्हाण यांनी विचारला.

विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही सरकारवर जोरदार टीका केली. सेवाग्राममधून प्रेरणा घेऊन आम्ही शेतक-यांवर अन्याय करणा-या जुलमी सरकारला ‘चले जाव’ सांगण्यासाठी संघर्षयात्रा काढली आहे. उद्योगपतींचे १ लाख कोटींचे कर्ज माफ करताना स्टेट बँकेच्या अध्यक्षा अरूंधती भट्टाचार्य यांना काहीच वाटले नाही, मग शेतकरी कर्जमाफीबद्दलच पोटशूळ का ? असा सवाल विखे पाटील यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री जयंत पाटील म्हणाले की, सरकारकडे बुलेट ट्रेन आणायला भरमसाट पैसे आहेत, मात्र शेतक-यांना मदत करण्यासाठी पैसे नाहीत. शेतकरी विरोधी सरकारला त्यांची जागा दाखवणे गरजेचे आहे.

समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनीही सरकारवर जोरदार टीका केली. शेतकरी कर्जमाफी मागणा-या आमदारांना ज्यांनी निलंबीत केले त्यांना शेतकरी निलंबीत करतील, असे ते म्हणाले.