चोर समजून पोलिसांना चोपले

 

कोंबडभुजे गावातील घटना, 7 पोलीस जखमी

नवी मुंबई, 7 मार्च 2017/AV News Bureau:

कोंबडभुजे गावात अवैधपणे राहणा-या बांगलादेशी नागरिकांवर कारावाई करण्यासाठी मुंबई मधून आलेल्या पोलिसांच्या एका पथकाला ग्रामस्थांनी चोर समजून मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये 7 पोलीस जखमी झाले असून दोन पोलिसांची प्रकृती गंभीर आहे.

कोंबडभुजे गावात काही बांगलादेशी अवैधपणे राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार मुंबई  पोलिसांचं एक पथक सोमवारी रात्री कोंबडभुजे गावात दाखल झाले होते. या पथकाने पोलीस वेशात न येता साध्या वेषातच गावात प्रवेश केला. एवढ्या रात्री पहिल्यांदाच दहा-बारा जण गावात आल्याचं पाहून हे चोरच असावेत, असा संशय गावकऱ्यांना आला. काही ग्रामस्थ पोलिसांना बघून चोर-चोर ओरडून त्यांच्या मागे त्यांना पकडण्यासाठी धावू लागले. गर्दी जमा झाल्यानंतर लोकांनीच काठी, बांबू आणि लाथाबुक्क्यांनी पोलिसांना मारहाण केली. या मारहाणीत पोलीस जखमी झाले. जखमी पोलिसांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून मारहाण करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.