ठाणे अग्निशमन दलात अत्याधुनिक क्वीक रिस्पॉन्स व्हेईकल दाखल

ठाणे,20 एप्रिल 2017/AV News Bureau:

ठाणे अग्निशमन दलामध्ये ५ क्वीक रिस्पॉन्स व्हेईकल आणि १ कंट्रोल पोस्ट व्हॅन ही अत्याधुनिक वाहने दाखल झाली आहेत. या वाहनांमध्ये ५०० लिटर्स पाणी व ५० लिटर्स फोम असून इतर आगीव्यतिरिक्त तेलजन्य व रासायनिक पदार्थांच्या आगीवरही नियंत्रण ठेवण्याचे तंत्र यामध्ये वापरण्यात आले आहे. या वाहनामध्ये मदत व शोध कार्यासाठी उपयुक्त ठरणारी कटींग, ब्रेकिंग, श्वसन उपकरणे, विविध प्रकारचे दोरखंड, अपघातग्रस्त वाहन खेचण्यासाठी विचगेअर, रात्रीच्यावेळी काम करता यावे यासाठी मास्ट लाईट आदी उपकरणेही आहेत.

मे. आर्यन पम्प्स व इन्व्हायरो सोल्यूशन्स या कंपनीने ही अत्याधुनिक वाहने निर्माण केली आहे. या वाहनांमध्ये आग विझविण्यासाठी वॉटर मिस्ट तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. कमी पाणी व जास्त हवेचा दाब या तत्वावर थंड करणे व दडपणे या अग्नीशमन विमोचनाचा वापर करून आगीवर प्रभावी नियंत्रण करण्याचे तंत्र या वाहनांमध्ये वापरण्यात आले आहे.

सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री  एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या अत्याधुनिक वाहनांचे आज लोकार्पण करण्यात आले. त्याचबरोबर ठाणे महानगरपालिकेच्या सहा अग्निशमन केंद्रांच्या दळणवळणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अत्याधुनिक बिनतारी यंत्रसामुग्री असलेली कंट्रोल पोस्ट व्हॅनचेही शिंदे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.