कांद्यावरून विधानभवनाबाहेर आंदोलन

मुंबई, 7 मार्च 2017/AV News Bureau:

कांद्यासह तुरीला हमीभाव द्यावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज विधानभवनाबाहेर आंदोलन छेडले. आंदोलकांनी कांदा फेकण्यास सुरूवात केल्यामुळे पोलिसांनी  शेट्टी यांच्यासह  कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी कांदा आणि तूरीच्या दरांवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विधानभवनाबाहेरच जोरदार आंदोलन केल्यामुळे  पुढील दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधक राज्य सरकारला कोंडीत धरणार असेच चित्र दिसत आहे.

सरकारमध्ये मित्र पक्ष असलो म्हणून काय झाले. शेतक-यांच्या प्रश्नांसाठी कोणतीही तडजोड न करता वेळ पडल्यास सत्तेतून बाहेर पडू, असेही शेट्टी यांनी संकेत दिले.  याशिवाय परिसरात कांदा व तुरीचा सडाही पडला होता. या वेळी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या गाडीवरही आंदोलकांनी कांदे फेकले.

गेल्या काही दिवसांपासून खासदार शेट्टी व राज्यमंत्री खोत यांच्यात सुरू असलेल्या मतभेदांचीही या आंदोलनाला किनार असल्याचे मानले जात आहे.  दोन दिवसांपूर्वी पुण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांची   बैठक पार पडली. तेव्हाही खोत हे बैठकीला अनुपस्थित राहिले होते. याशिवाय नुकत्याच झालेल्या महापालिका, जिल्हा परिषद निवडणुक काळात खोत यांची भाजपशी विशेषत: मुख्यमंत्र्यांशी होत असलेल्या जवळीकीबाबत खासदार शेट्टी यांनी नाराजी व्यक्त केली होती. .

दरम्यान, राजू शेट्टी हे शेतक-यांचे नेते असून ते शेतक-यांच्या न्यायासाठी नेहमीच आंदोलने करत असतात. हे आंदोलन माझ्याविरोधात नाही, तर कांदा व तुरीला रास्तभाव मिळावा यासाठी करण्यात आले. आम्हा दोन्ही नेत्यांमध्ये सुसंवाद आहे आणि कोणतेही मतभेद  नाहीत. सरकार  मागण्यांची योग्य ती दखल घेत असून लवकरच शेतक-यांना दिलासा दिला जाईल, असेही सदाभाऊ खोत म्हणाले.