डीपीएसने आरटीई अंतर्गत प्रवेश नाकारला

मनविसेच्या पाठपुराव्याने शिक्षण अधिका-यांची शाळेला नोटीस

नवी मुंबई, 15 मार्च 2017/AV News Bureau:

शिक्षण हक्क कायद्यानुसार दुर्बल व वंचित घटकातील 25 टक्के ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी निश्चित करण्यात आलेला प्रवेश देण्यास डीपीएस शाळा व्यवस्थापनाने नकार दिला. याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी सेनेने तीव्र आंदोलनाला इशारा देताच अखेर आज महापालिकेच्या शिक्षण अधिकाऱ्यांनी डीपीएस शाळेला प्रवेश द्या अन्यथा मान्यता रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल असा लेखी इशारा दिला आहे.

नवी मुंबई मनपा क्षेत्रात आरटीई प्रवेश प्रक्रियेत 2017-18 या वर्षात एकूण १०७ शाळा पात्र झाल्या होत्या. त्यात डीपीएस शाळेत आरटीई तून प्रवेश घेताना नर्सरीसाठी ५० जागांचा उल्लेख आहे. त्या अनुषंगानेच दुर्बल व वंचित घटकातील पालकांनी आपल्या पाल्यासाठी डीपीएस शाळेमध्ये नर्सरीसाठी प्रवेश पाहिजे यासाठी ऑनलाईन अर्ज भरले. त्याची प्रवेश यादी ७ मार्च २०१७ ला प्रसिध्द झाल्याचे संदेश पालकांना पाठविण्यात आले. मात्र शाळा व्यवस्थापनाने आमच्याकडे नर्सरीसाठी प्रवेश नसून पहिली इयत्तेसाठी आरटीई च्या जागा असल्याचे सांगत प्रवेश देण्यास नकार दिला. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या पालकांनी याबाबात मनसेकडे तक्रार केली. मनसे विद्यार्थी सेनेने आक्रमक भूमिका घेत तीव्र आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर आज शिक्षण अधिकाऱ्यांनी डीपीएस शाळा व्यवस्थापनाला याबाबत प्रवेश द्या अन्यथा मान्यता रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल असा लेखी इशारा दिल्याचे मनविसे शहर अध्यक्ष सविनय म्हात्रे यांनी सांगितले. तसेच शनिवार १८ मार्च ही प्रवेशाची अंतिम मुदत असून त्या अगोदर पालकांना आरटीई अंतर्गत प्रवेश घेताना काही अडचणी किंवा समस्या आल्यास तात्काळ मनविसेला संपर्क करण्याचे आवाहन उपशहर अध्यक्ष सनप्रीत तुर्मेकर यांनी केले आहे.