ओल्या कच-यापासून सेंद्रीय खत

नवी मुंबई महानगरपालिकेकडून दररोज 50 मेट्रिक टन सेंद्रिय खताची निर्मिती

नवी मुंबई, 5 जानेवारी 2018/avirat vaatchal news:

नवी मुंबई महानगरपालिकेचा तुर्भे येथील भू भरणा पध्दतीवर आधारीत शास्त्रोक्त घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प पर्यावरणपूरक प्रकल्प म्हणून नावाजला जातो. याठिकाणी ओल्या कच-यापासून खतनिर्मिती केली जात असून हे सेंद्रीय खत पिकांच्या वाढीसाठी उपयुक्त सिध्द होत असल्याने या खताला वाढती मागणी आहे.

प्रकल्पाच्या ठिकाणी दररोज साधारणत: 700 मेट्रिक टन कचरा येतो. त्यामध्ये 60 टक्क्यांइतका ओला कचरा असतो. यातून सध्या दररोज 40 ते 50 मेट्रिक टन सेंद्रिय खताची निर्मिती केली जात असून हे सेंद्रीय खत दोनशेहून अधिक उद्याने विकसित करण्यासाठी वापरले जात आहे.

त्याचप्रमाणे हे सेंद्रीय खताची मोठ्या प्रमाणावर शेतक-यांना विक्री केली जात आहे. ठाणे जिल्ह्यातील डहाणू, वसई, शहापूर भाग, रायगड जिल्ह्यातील माणगाव, पेण तसेच पालघर जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये आणि पुणे जिल्ह्यातील तळेगाव पर्यंतचे शेतकरी हे सेंद्रीय खत घेऊन जात आहेत. एकदा खत घेऊन जाणा-या व्यक्तीला त्याचा उत्पादनावर चांगला परिणाम दिसून येत असल्यानेच ते वारंवार खत घेऊन जाताना दिसतात.

ओला व सुका असे कच-याचे वर्गीकरण घरापासूनच

पूर्वी प्रक्ल्पस्थळी येणारा कचरा हा संमिश्र स्वरूपाचा होता. मात्र नागरिकांनी ओला व सुका असे कच-याचे वर्गीकरण घरापासूनच करावे या आवाहनाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून सध्या 85 टक्क्यांपर्यंत कच-याचे ओला व सुका असे वर्गीकरण निर्मितीच्या ठिकाणीच केले जात आहे. असा वर्गीकृत ओला कचरा स्वतंत्रपणे प्रक्लपस्थळी आणला जात असल्याने पूर्वी संमिश्र स्वरूपात येणा-या कच-याचे वर्गीकरण करण्यास तो वेळ लागत होता त्यामध्ये पूर्णत: बचत झाली आहे. शिवाय या वर्गीकरणासाठी लागणा-या श्रम आणि ख्रर्चातही बचत झाली आहे.