स्त्रीभ्रूण हत्याविरोधी मोहिमेचे अमिताभ ब्रँड ॲम्बेसेडर ?

मुंबई, 21 मार्च 2017/AV News Bureau:

स्त्रीभ्रुण हत्याविरोधी जनजागृती मोहिमेकरिता ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी काम करावे, अशी विनंती त्यांना करण्यात येणार असल्याची माहिती, आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली.

स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी तसेच मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी सामाजीक प्रबोधन आवश्यक असून त्या माध्यमातून जाणीवजागृती व समाज मानसिकता बदलणे गरजेचे आहे. प्रबोधनाची ही चळवळ प्रभावशाली होण्याकरिता या मोहिमेचे ब्रँड ॲम्बेसेडर होण्याकरिता प्रसिद्ध व्यक्ती योग्य ठरेल. बच्चन हे राज्य शासनाच्या वन विभाग तसेच क्षयरोग प्रतिबंधक मोहिमेचे ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून काम पाहतात. म्हणूनच त्यांना विनंती करण्यात येणार आहे, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यात मुलींचा जन्मदर काही जिल्ह्यांमध्ये वाढत असून राज्यात सर्वाधिक जन्मदर हा भंडारा जिल्ह्याचा आहे, ही दिलासादायक बाब असून  2015 च्या तुलनेत 78 अंकांनी मुलींचा जन्मदर वाढला आहे तर सर्वात कमी जन्मदर वाशिम जिल्ह्याचा आहे. ही मात्र चिंताजनक बाब आहे. प्रसुतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधात्मक कायद्याच्या (पीसीपीएनडीटी) प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य शासनाने कठोर पावले उचलली आहेत. राज्याच्या सीमेलगत अन्य राज्यांचे जिल्हे आहेत, त्या ठिकाणी गर्भलिंग निदान केले जाते आणि महाराष्ट्रात येऊन गर्भपात केला जातो. यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने कर्नाटक, गुजरात यासारख्या राज्यांना पत्र लिहून आवश्यक ती उपाययोजना करण्याची विनंती केली आहे. गर्भलिंग चाचणीस महिलेस प्रवृत्त करणाऱ्या व तिच्यावर दबाव टाकणाऱ्या व्यक्तिला पीसीपीएनडीटी कायद्यातील कलम 23(3) नुसार शिक्षेची तरतूद आहे. या कलमाची यंत्रणेने प्रभावीपणे अंमलबजावणी करुन गर्भलिंग निदान व स्त्रीभ्रूण हत्येस प्रवृत्त करणाऱ्या व्यक्तिंना कठोर शिक्षा करावी असे आरोग्य मंत्री डॉ.सावंत यांनी सांगितले.

सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ येथील स्त्रीभ्रुण हत्या घटनेच्या पार्श्वभूमीवर स्त्रीभ्रुण हत्या विरोधी राज्य पर्यवेक्षकीय मंडळाची बैठक मंत्रालयात झाली. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, आमदार भारती लव्हेकर यांच्यासह मंडळाचे सदस्य उपस्थित होते. बैठकीस आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. विजय सतबीर सिंग, कुटुंब कल्याण आयुक्त रमेश देवकर, आरोग्य संचालक डॉ. सतिश पवार यांच्यासह मंडळाचे सदस्य उपस्थित होते.