स्थानिक महिला बचत गटांनी निर्मिलेल्या उत्पादनांचे प्रदर्शन – विक्री व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, 29 ऑक्टोबर 2026
दिवाळी सणानिमित्त मोठ्या प्रमाणात विविध वस्तू व साहित्याची खरेदी होत असते. त्यामुळे याचा लाभ स्थानिक महिला बचत गट व महिला संस्था यांनी बनविलेल्या वस्तू व साहित्याला मिळावा यादृष्टीने नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांच्या माध्यमातून भव्यतम हिरकणी महोत्सवाच्या दिवाळीपूर्वी आयोजन करण्यात आले आहे.
या माध्यमातून महिलांच्या अंगभूत कलागुणांना व स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा नवी मुंबई महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीचा प्रयत्न असून 1 ते 4 नोव्हेंबर 2026 या कालावधीत करावे – सेक्टर 26, नेरुळ येथील गणपतशेठ तांडेल प्रदर्शनी मैदानात सकाळी 11.00 ते रात्री 10.00 या वेळेत सदर प्रदर्शन नागरिकांसाठी खुले असणार आहे.
क्लिक करा: नवी मुंबईत फॉर्म्युला कार रेस ट्रॅकसाठी तब्बल 40 कोटींचा खर्च
महोत्सवातील प्रमुख कार्यक्रम रूपरेषा:
रविवार, दि. १ नोव्हेंबर २०२६: सकाळी ११.०० वा. – उद्घाटन सोहळा; संध्याकाळी ७.०० वा. – दीप संध्या गंगा आरती
सोमवार, दि. २ नोव्हेंबर २०२६: संध्या. ६.०० वा. – महापालिका क्षेत्रातील महिलांसाठी खुले व्यासपीठ (गायन, वादन, नृत्य व मंगळागौर इ.)
मंगळवार, दि. ३ नोव्हेंबर २०२६: संध्याकाळी ६.०० वा. – महिलांसाठी विशेष ‘खेळ पैठणीचा – होम मिनिस्टर’
बुधवार, दि. ४ नोव्हेंबर २०२६: संध्याकाळी ६.०० वा. – महोत्सवाचा भव्य समारोप व पारितोषिक वितरण सोहळा
क्लिक करा: मानसिकतेविरूध्द कायद्याची साथ महत्त्वाची
या भरगच्च कार्यक्रमांच्या माध्यमातून ‘स्त्री सक्षमीकरणाची ज्योत लावूया, प्रत्येक हाती स्वावलंबनाची पणती देऊया!’ – ही संकल्पना नजरेसमोर ठेवून महिलांच्या स्वावलंबनाला व स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी नवी मुंबईकरांनी या प्रदर्शन व विक्री महोत्सवाला मोठ्या संख्येने भेट देऊन सहकार्य करावे, असे आवाहन महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सलुजा सुतार व उपसभापती रूपाली भगत यांच्या वतीने करण्यात येत आहे.
========================================================














