- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- मुंबई, 27 ऑक्टोबर 2026
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी (ता.वेंगुर्ला) विमानतळावरून प्रवासी वाहतुकीला चालना मिळावी यासाठी चिपी-नवी मुंबई-चिपी हवाई प्रवासासाठी १०० टक्के व्यवहार्यता तफावत निधी (व्हायाबिलिटी गॅप फंडीग) देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
केंद्र सरकारने सामान्य नागरिकांना विमान प्रवास करता यावा यासाठी रिजनल कनेक्टिवीटी स्कीम (आरसीएस) जाहीर केली होती. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकार, राज्य शासन आणि भारतीय विमानपत्तन प्राधिकरण यांच्यात त्रिस्तरीय सामंजस्य करार आहे. या करारामध्ये अमरावती, गोंदिया, नाशिक, जळगाव, नांदेड, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग विमानतळांचा समावेश आहे.
क्लिक करा : शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला सर्वोच्च प्राधान्य:पोलीस अधीक्षक नितीन बगाटे
आरसीएस योजनेनुसार विमानतळ परिचालकांना सवलती देण्यात येतात. यानुसार राज्यात निश्चित केलेल्या हवाई मार्गासाठी केंद्र सरकारकडून ८० टक्के व राज्य शासनाकडून २० टक्के (व्हायाबिलिटी गॅप फंडीग) अनुदान देण्यात येते.
यानुसार चिपी विमानतळावरून चिपी-मुंबई-चिपी विमानसेवा सुरू करण्यास फ्लाय ९१ कंपनीला (Just Udo Aviation Pvt.Ltd.) मान्यता देण्यात आली होती. परंतु कंपनीला हवाई सेवा सुरू करण्यासाठी मुंबई विमानतळावर निश्चित कालावधी (स्लॉट) उपलब्ध झाला नाही. त्यामुळे आता मुंबई विमानतळाऐवजी चिपी- नवी मुंबई व नवी मुंबई-चिपी या दोन्हीही मार्गासाठी एका आसनामागे ६ हजार दोनशे रूपये (व्हायाबिलिटी गॅप फंडीग) निधी देण्यास मान्यता देण्यात आली.
या दोन्ही मार्गांसाठी एका वर्षासाठी अनुदानापोटी १६ कोटी ७४ लाख ६२ हजार रूपयांचा खर्च अपेक्षित आहे, या खर्चास मान्यता देण्यात आली.
========================================================














