पुढील वर्षापासून साहित्य खरेदीची रक्कम बँकेत

शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची माहिती

 मुंबई, 23 मार्च 2017 /AV News Bureau:

पुस्तके वगळता शालेय साहित्य खरेदीसाठीची रक्कम विद्यार्थ्यांच्या थेट बॅंक खात्यात जमा करण्याची योजना पुढील वर्षापासून राबविण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत दिली.

सदस्य भीमराव तापकीर यांनी पुणे शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांना केलेल्या निकृष्ट दर्जाच्या दप्तरांचे वाटप केल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.

 पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या वतीने विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्यात आले. त्यातील सुमारे 3416 दप्तरे फाटल्याचे निदर्शनास आल्यानंतर संबंधित ठेकेदाराने दप्तरे बदलून दिली. या प्रकरणाची चौकशी करण्यात आली असून त्याचा अहवाल पुणे महापालिका आयुक्तांना सादर करण्यात आला आहे, असे तावडे यांनी सांगितले.

निकृष्ट दर्जाची दप्तरे पुरविणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात येईल. मुंबई वगळता अन्य महापालिकांमध्ये शिक्षण मंडळ अस्तित्वात असणार नाही. त्यामुळे त्यांना खरेदीचा अधिकार देण्याबाबतचा प्रश्नच येणार नाही.