मंत्रालयात सोमवारी ऑनलाइन लोकशाही दिन

 मुंबई,12 मे 2017/AV News Bureau:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात सोमवारी सकाळी 11 वाजता ऑनलाईन लोकशाही दिन आयोजित करण्यात आला आहे.

ज्या अर्जदारांनी अर्जाच्या विहित प्रपत्राच्या नमुन्यानुसार अर्जाची आगाऊ प्रत व त्यासह आवश्यक कागदपत्रांच्या प्रती जोडल्या असतील आणि ज्यांना अर्ज स्वीकृतीबाबत सामान्य प्रशासन विभागामार्फत कळविण्यात आले आहे, अशा मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील अर्जदारांना लोकशाही दिनी थेट मुख्यमंत्र्यांकडे आपल्या तक्रारी मांडता येणार आहे.

  • जिल्हाधिकारी कार्यालयात सोय

मुंबई व मुंबई उपनगर जिल्हा वगळता इतर जिल्ह्यातील संबंधित अर्जदारांनी त्यांची तक्रार मुख्यमंत्री यांच्याकडे मांडण्यासाठी आपापल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयातील दालनात दिनांक 15 मे, 2017 रोजी सकाळी 10.30 वाजता प्रत्यक्ष उपस्थित रहावे. ज्या तक्रारदारांचे अर्ज स्वीकृत करण्यात आले आहेत आणि ज्या अर्जदारांना दूरध्वनीद्वारे दूरचित्रवाणी परिषदेकरिता उपस्थित राहण्याबाबत सूचना दिल्या आहेत, अशा अर्जदारांना जिल्हाधिकारी कार्यालयातील दूरचित्रवाणी परिषद दालनात प्रवेश देण्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी यांना निर्देश देण्यात आले आहेत.