जम्मू काश्मीरमध्ये चार दहशतवादी ठार

जम्मू, 5 जून 2017:

काश्मीरच्या बांदीपुरा जिल्ह्यातील संबळ भागात असलेल्या सीआरपीएफच्या तळावर दहशतवाद्यांनी आज सकाळी हल्ला केला. यावेळी भारतीय जवानांनी केलेल्या जोरदार प्रत्युत्तरात चार दहशतवादी ठार झाले. चकमकीनंतर दहशतवाद्यांकडील मोठ्या प्रमाणात शस्रसाठा जप्त केला आहे.

 आज पहाटे 3.45 च्या सुमारास सीआरपीएफच्या 45 बटालियनवर सशस्र दहशतवाद्यांनी हल्ला केला. यावेळी भारतीय जवानांनी जोरदार प्रतिहल्ला केला. सुमारे दीड तास चाललेल्या या धुमश्चक्रीत चार दहशतवाद्यांना भारतीय जवानांनी ठार मारले. या धुमश्चक्रीत एकही भारतीय जवान जखमी झालेला नसल्याचे लष्करी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

या  हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने दहशतवाद्यांची शोध मोहीम सुरू केली आहे.