स्वाइन फ्ल्यू नियंत्रणासाठी आरोग्य विभाग सतर्क

नवी मुंबई, 7 जुलै 2017/AV News Bureau:

मुंबई, ठाणे, नवी मुंबई व  महाराष्ट्रातील काही भागात स्वाइन फ्ल्यू आजाराचा प्रसार झाल्याचे दिसून येत असून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात या आजाराचा प्रसार होऊ नये याकरीता महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत आजार प्रतिबंधात्मक जनजागृतीपर उपक्रम ठिकठिकाणी राबविले जात आहेत.

या आजाराविषयी नागरिकांनी घाबरून जाऊ नये म्हणून गृह भेटीव्दारे तसेच स्थानिक पातळीवर असलेल्या प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रामार्फत गटचर्चा घडवून जनजागृती करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे महानगरपालिकेकडे यासाठीचा आवश्यक औषध साठा व उपकरणे उपलब्ध करून ठेवण्यात आलेली आहेत. सार्वजनिक रुग्णालय वाशी येथे 8 बेडचे आणि डॉ. डी.वाय.पाटील रुग्णालय नेरुळ येथे 5 बेडचे स्वतंत्र विलगीकरण कक्ष संशयीत स्वाइन फ्ल्यू रुग्ण उपचारासाठी सुरु करण्यात आल्याची माहिती नवी महापालिका प्रशासनाने दिली आहे.

नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये एप्रिल 2017 पासून एकूण 33 संशयीत रुग्ण आढळून आले असून त्यापैकी 19 रुग्णांचे थ्रोट स्वॅब नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी 12 रुग्णांचा तपासणी अहवाल पॉझीटिव्ह आला आहे. या 12 पॉझिटिव्ह रूग्णांना रूग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उचित उपचार करण्यात आले असून यापैकी 7 रूग्ण पूर्णत: बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सद्यस्थितीत 5 रूग्ण रूग्णालयांत उपचार घेत आहेत. या पॉझिटिव्ह रूग्णांच्या संपर्कातील 38 व्यक्तींचीही तपासणी करून आवश्यक उपचार करण्यात आले आहेत, असे महापालिकेने कळविले आहे.

  • स्वाइन फ्लूचा प्रसार

स्वाईन फ्ल्यू हा विषाणूमुळे होणार आजार असून हा आजार असणा-या व्यक्तीशी संपर्क आल्यास एका व्यक्तीपासून दुस-या व्यक्तीस होतो.

  • लक्षणे

ताप येणे, खोकला, घसा दुखणे, अतिसार, उलट्या, श्वास घेण्यास त्रास होणे ही या आजाराची लक्षणे आहेत.

  • उपाययोजना

हा आजार टाळण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना म्हणून हात सातत्याने साबण व पाण्याणे धुणे, गर्दीमध्ये जाण्याचे टाळणे, खोकताना – शिंकताना तोंडाला रुमाल लावणे, भरपूर पाणी पिणे, पुरेशी झोप घेणे, पौष्टिक आहार घेणे गरजेचे आहे. स्वाईन फ्ल्यू आजाराची लक्षणे आढळल्यास त्वरीत नवी मुंबई महानगरपालिकेच्या जवळच्या रुग्णालयाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.