तिकिटांवरील जीएसटीतून नाट्यगृहे उभारणार

सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे

अलिबाग, 7 जुलै 2017/AV News Bureau:

जीएसटी करप्रणाली लागू झाल्यापासून नाट्य व चित्रपट निर्मात्यांना वाटणारी चिंता लक्षात घेता शासनाने 250 रुपयांवरील तिकीटांवर जीएसटी आकारण्याची मर्यादा ही 500 रुपयांपर्यंत वाढवावी, अशी विनंती  जीएसटी नियामक मंडळाला केली आहे. तिकीटांवरील कराच्या रकमेतून राज्याला प्राप्त होणारा निधी नाट्यगृहे बांधण्यासाठीच वापरायचा असे धोरणा शासनाने ठरविले आहे, असे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आज येथे जाहीर केले.

पीएनपी  सांस्कृतिक कलाविकास मंडळाने उभारलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण प्रसंगी तावडे बोलत होते.

राज्यातील प्रत्येक जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी नाट्यगृह असावं, अशी शासनाची भुमिका असल्याचा पुनरुच्चार केला. चांगले चित्रपट प्रदर्शित करता यावे यासाठीही मल्टिप्लेक्स चित्रपटगृहात सुविधा उपलब्ध करण्यासाठीही शासन प्रयत्नशिल असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय नव्या पिढीला प्रेरणा मिळावी यासाठी जुन्या कलावंतांच्या आठवणी डिजीटल स्वरुपात संग्रहीत करण्याचा उपक्रमही शासनाने सुरु केल्याची माहिती तावडे यांनी यावेळी दिली.