राज्यातील क्षयरुग्णांना दैनंदिन औषधी पुरवठा होणार

क्षयरुग्ण शोधण्यासाठी घरोघरी सर्व्हेक्षण 

कुपोषण उपचार केंद्रात प्रत्येक बालकाची क्षयरोग तपासणी

मुंबई, 25 जानेवारी 2017/AV News Bureau:

सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत क्षयरुग्णांना दैनंदिन औषधी पुरवठा करण्याचा निर्णय केंद्र शासनाकडून घेण्यात आला आहे. सुरुवातीच्या टप्प्यातील पाच राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश करण्यात आला आहे. तसेच देशातील 50 जिल्ह्यांत 16 ते 30 जानेवारी या कालावधीत घरोघरी जाऊन सर्व्हेक्षणाद्वारे क्षयरुग्ण शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यांत या मोहिमेने वेग घेतला आहे.

  • क्षयरुग्ण शोधण्यासाठी सर्वेक्षण

क्षयरुग्णांना सध्या “डॉटस्” उपचारपद्धती अंतर्गत औषधी पुरविण्यात येतात. मात्र, त्यात सुधारणा करुन क्षयरुग्णांना दैनंदिन औषधी पुरवठा करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. देशभरात हा उपक्रम टप्प्याटप्प्याने राबविण्यात येत आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रासह पाच राज्यांचा समावेश आहे. राष्ट्रीय क्षयरोग विभागाकडून पुरविण्यात आलेला औषधी साठा उपलब्ध होताच तात्काळ क्षयरुग्णांना दैनंदिन औषधी पुरवठा सुरु करण्यात येणार आहे. तसेच क्षयरुग्ण आढळण्याची शक्यता असलेल्या निकषांचा विचार करुन, देशभरातील 50 जिल्ह्यांमध्ये घरोघरी जाऊन क्षयरुग्ण शोधण्यासाठी सर्व्हेक्षण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे

  • क्षयरोग्याची माहिती न देणाऱ्या वैद्यकीय आस्थापनांवर कारवाई होणार

केंद्र शासनाने अधिसूचित आजार (नोटिफाएबल डिसीज) म्हणून निर्देशित केलेल्या क्षयरोगाचा रुग्ण आढळल्यास त्याची सूचना संबंधित सक्षम प्राधिकाऱ्यांकडे तात्काळ देणे सर्व वैद्यकीय व्यावसायिक, वैद्यकीय संस्था आणि संबंधितांना बंधनकारक आहे. मात्र, त्यात टाळाटाळ करणाऱ्यांवर पुढील कार्यवाही करण्यासाठी कायदा करण्याची कार्यवाही राज्य शासनाकडून वेगाने सुरु आहे. असा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे.क्षयरुग्णांची निश्चित माहिती उपलब्ध होणे, त्यांना वेळीच व परिपूर्ण उपचार उपलब्ध होणे, यासाठी निश्चितच त्याचा फायदा होणार आहे. तसेच कुपोषण उपचार केंद्रांमध्ये येणाऱ्या प्रत्येक बालकाची तपासणी करताना त्यामध्ये क्षयरोगाची चाचणीही आता आवश्यक करण्यात आली आहे.

  • राज्यात 3 हजार 761 बालकांवर कुपोषणाविषयक उपचार

महाराष्ट्रातील विविध जिल्हानिहाय 36 कुपोषण उपचार केंद्रांमध्ये जुलै ते डिसेंबर 2016 या कालावधीमध्ये एकूण 3 हजार 761 बालके कुपोषणविषयक उपचारांसाठी दाखल करण्यात आली. या बालकांमध्ये केलेल्या तपासणीअंती एकूण 64 बालकांना क्षयरोगाची लागण आढळून आली. या बालकांना आवश्यकतेनुसार सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत उपचार सुरु करण्यात आले आहेत.

  • राज्यभरात 72 संयत्रे उपलब्ध

संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व जिल्हा रुग्णालये आणि सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये जीन एक्सपर्ट हे संयंत्र उपलब्ध करुन देण्यात येत आहे.  या संयंत्रामुळे क्षयरोगाचे निदान अचूक आणि जलदगतीने होणार आहे. परिणामी क्षयरोगाचे निदान होताच तातडीने उपचार सुरु करण्यात येणार असून उपचारांमधला विलंब आता टळणार आहे.

बृहन्मुंबई महापालिका परिक्षेत्रात 22, ठाणे परिक्षेत्रात 8, नागपूर परिक्षेत्रात 4, पुणे परिक्षेत्रात 4,नाशिक परिक्षेत्रात 3, कोल्हापूर परिक्षेत्रात 2 व इतर जिल्ह्यांमध्ये एक याप्रमाणे एकूण 72 संयंत्रे राज्यभरात उपलब्ध करण्यात आली आहेत.