लालू- नितीश जोडी तुटली

नितीशकुमार यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा

पटना, 26 जुलै 2017/AV News Bureau:

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आज मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांच्याकडे सोपवला. माजी मुख्यमंत्री लालुप्रसाद यादव यांच्याशी बिनसल्यानंतर नितीशकुमार यांनी दिलेल्या राजिनाम्यामुळे बिहारच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. दरम्यान, नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजिनामा दिल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटरवरून त्यांचे अभिनंदन केले. त्यामुळे आगामी काळात पुन्हा सत्तेवर स्वार होण्यासाठी नितीश कुमार भाजपची मदत घेणार की नव्याने सार्वत्रिक निवडणुकीला सामोरे जाणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

गेल्या काही दिवसांपासून माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव आणि त्यांचे पुत्र व बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले जात होते. त्यामुळे तेजस्वी यादव यांचा राजिनामा घेण्यासाठी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर मोठा दबाव वाढत होता. तर दुसरीकडे लालू प्रसाद यादव यांनीदेखील तेजस्वी यादव मुख्यमंत्रीपदाचा राजिनामा देणार नसल्याचे स्पष्ट केल्यामुळे बिहारमधील महाआघाडीत तणाव वाढला होता.

गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज संध्याकाळी राजभवनात जाऊन आपल्या पदाचा राजिनामा राज्यपालांकडे दिला.

राजभवानाच्या बाहेर पडल्यानंतर नितीश कुमार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. माझ्यावर अनेक आरोप केले गेले. मात्र आम्ही कोणाकडेही राजिनाम्याची मागणी केली नव्हती. बिहारच्या भल्यासाठी आम्ही एकत्र येऊन काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. अनेक समाज हिताचे निर्णय घेतले. मात्र आता आघाडीत काम करणे आणि सरकार चालविणे अशक्य  झाल्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा राजिनामा दिल्याचे नितीश कुमार यांनी सांगितले.

  • बिहार विधानसभेतील पक्षीय बलाबल

बहुमतासाठी 122  आमदारांची गरज आहे. जेडीयू (71) आणि भाजप तसेच मित्र पक्षांची (58) मदत मिळाल्यास 129 संख्याबळ होते. जे बहुमतापेक्षा अधिक आहे. त्यामुळे नितिश कुमार कोणता निर्णय घेतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

सत्तास्थापनेसाठी नितीश कुमार काय करू शकतात

  • भाजपसोबत जाऊन पुन्हा सत्तेसाठी दावा करणे
  • भाजपचे बाहेरून समर्थन घेऊन पुन्हा  सरकार स्थापन करणे
  • मध्यावधी निवडणुकांना नव्याने स्वतंत्रपणे सामोरे जाणे