आयटीआयच्या परीक्षा ऑनलाइन होणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, 29 जुलै 2017/AV News Bureau:

राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे आता आयटीआयच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. जानेवारी २०१८ पासून त्याची अंमलबजावणी करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

कौशल्य विकास व उद्योजकता विभागाची आढावा बैठक आज मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री राजीव प्रताप रुडी यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

केंद्र शासनाच्या शिकाऊ उमेदवारी कायदा १९६१ मध्ये सुधारणा करण्यात आली आहे.  महाराष्ट्रातील युवकांना जास्तीत जास्त ॲप्रेन्टीसशिप मिळवून देण्यात महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे. ॲप्रेन्टीस ॲक्टमधील सुधारणेमुळे राज्यातील युवकांना अधिकाधिक रोजगार आणि स्वयंरोजगार देण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यास मदत होणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

कौशल्य विकास कार्यक्रमात धोरणात्मक सुधारणेअंतर्गत राज्य व्यवसाय प्रशिक्षण परिषदेला स्वायत्ता प्रदान करण्यात आली आहे. कौशल्य विकास संस्थाचे नोंदणीकरण, १५ ते ४५वयोगटातील युवक युवतींना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण, शेतकऱ्यांसाठी कृषी आणि संलग्न क्षेत्रातील व्यवसाय प्रशिक्षणासाठी विविध योजना, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळादवारे आर्थिकदृष्टया मागास घटकांना मदत, तांत्रिक प्रशिक्षणास प्रोत्साहन देण्यासाठी द्विलक्षी अभ्यासक्रमाच्या व्याप्तीत वाढ अशा विविध विषयात कौशल्य विकास विभागाने आघाडी घेतली असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.