शाळांच्या दुरूस्ती कामात दिरंगाई करणाऱ्या कार्यकारी अभियंत्यावर होणार शिस्तभंगाची कारवाई :आयुक्त अभिजीत बांगर

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • ठाणे, 25 ऑगस्ट 2023

ठाणे महापालिकेच्याज्या शाळांची कामे अद्याप सुरू झालेली नाहीत किंवा काही शाळांची कामे  धीम्या गतीने सुरू आहेत अशा संबंधित कार्यकारी अभियंत्यांना यांनी नोटीस बजावण्यात आल्या असून विहित मुदतीत नोटीसाचा खुलासा न केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी नमूद केले.

महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळा व शिक्षणाविषयी आपुलकी निर्माण व्हावी किंबहुना आपल्या शाळेची इमारत ही सुस्थितीत असावी व शिक्षण घेताना त्यांना आनंद मिळावा यासाठी महापालिकेच्या नादुरूस्त शाळा सुस्थितीत असाव्यात याकामी  इमारत दुरूस्ती अंतर्गत 15 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. शाळा दुरूस्तीच्या कामाचा कार्यादेश निघाल्यानंतर  इमारतींच्या दुरूस्तीचे काम हाती घेवून ते लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्‌त अभिजीत बांगर यांनी दिले होते.

शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा सतत वावर सुरू असतो, त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी शाळांची दुरूस्ती प्राधान्याने होणे आवश्यक आहे. शाळांच्या दुरूस्तीचा कार्यादेश मार्च 2023 मध्ये देण्यात येऊनही दुरूस्तीचे काम पूर्ण न झाल्याने संबंधित कार्यकारी अभियंत्यांना नोटीस बजावण्यात आली असल्याचे आयुक्त बांगर यांनी नमूद केले. ठाणे महानगरपालिका क्षेत्रामधील ज्या शाळांची दुरूस्ती आवश्यक आहे अशा एकूण 34 शाळा दुरूस्तीच्या कमांची रक्कम रु 14, कोटी 99 लाख 95,000/- असून एकत्रित निविदा सन 2022-23 अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आली होती.  तसेच त्यासाठीचा कार्यादेशही 08 मार्च 2023 रोजी देण्यात आला असल्याचे आयुक्त बांगर यांनी नमूद केले. या निविदेमध्ये प्रत्येक प्रभाग समिती हद्दीतील शाळांच्या दुरूस्तीचा अंतर्भाव करण्यात आला असून त्यापैकी फक्त 5 शाळांच्या दुरूस्तीचे काम 100 टक्के पूर्ण झाले आहे. तर 9 शाळांच्या दुरूस्तीचे काम 50 टक्क्यापेक्षा जास्त झाले असून ती कामे प्रगतीपथावर आहे. मात्र 8 शाळांच्या दुरूस्तीचे काम संथगतीने सुरू असून सदरची कामे अत्यंत असमाधानकारक आहेत. तर 12 शाळांच्या दुरूस्तीच्या कामाची सुरूवात झालेली नाही.

वागळे विभागातील ठामपा शाळा क्र. 23 चे 40 टक्के, कळवा विभागातील शाळा क्र. 129, 69, 70, 115, 29 या शाळांचे 30 टक्के, माजिवडा मानपाडा शाळा क्र. 53, 54 व लोकमान्य सावरकनगर विभागातील शाळा 46 चे 25 टक्के, वर्तकनगर विभागातील शाळा क्र. 65 व मुंब्रा विभागातील शाळा क्र.  75, 118 चे 20 टक्के काम पूर्ण झाले आहे.

काम सुरू न झालेल्या शाळा

 कळवा विभागातील शाळा क्र. 4,6,72,68, माजिवडा मानपाडा विभागातील शाळा क्र. 59,52,128, मुंब्रा विभागातील शाळा क्र. 78,123,113,77,124,116, दिवा विभागातील शाळा क्र. 85,90,91 तर नौपाडा विभागातील शाळा क्र.16 या शाळांच्या कामांना अद्याप सुरूवात झालेली नाही. या शाळांच्या कामाची जबाबदारी सोपविलेल्या कार्यकारी अभियंत्यांना नोटीस बजावण्यात आली असून अपूर्ण असलेल्या कामांबाबतचा लेखी खुलासा मागविण्यात आला आहे. तसेच विहित मुदतीत खुलासा सादर न केल्यास संबंधितांवर शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल असेही नोटीशीत नमूद करण्यात आले आहे.

महानगरपालिकेच्या शाळा भौतिकदृष्ट्या सुस्थितीत असाव्यात, शाळांमध्ये गळती नसावी, शौचालय सुस्थितीत असावेत तसेच रंगरंगोटीसहीत शाळेतील परिसर देखील सर्व नीटनेटका असावा यासाठी शाळांच्या दुरूस्तींची कामे हाती घेण्यात आली आहेत. सदर कामे गुणवत्तेने होणे तर आवश्यक आहेच त्याचवेळी ही कामे कालमर्यादेमध्ये पूर्ण होणेही गरजेचे आहे, याबाबत कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही अशा सूचना कार्यकारी अभियंत्यांना दिल्या असल्याचे बांगर यांनी नमूद केले.

========================================================


========================================================