सीताफळ प्रक्रिया उद्योगाला ‘नोगा’च्या माध्यमातून चालना द्या

  • कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर

मुंबई, 26 सप्टेंबर 2017/AV News Bureau:

सीताफळावर प्रक्रिया करून त्याचे ‘नोगा’ (Nagpur Orange Growers Association) ब्रॅण्डच्या माध्यमातून विपणन करण्याबाबत कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज सूचना दिली. मंत्रालयात कृषी औद्योगिक विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची बैठक झाली. custard apple processing project

  • ‘नोगा’च्या माध्यमातून टोमॅटो, संत्रा आदींवर प्रक्रिया करून रस, पल्प या उत्पादनांची विक्री केली जाते. राज्यात सीताफळाची लागवड मोठ्या प्रमाणावर आहे. आईसक्रिम उद्योग क्षेत्रातून सिताफळाच्या पल्पला मोठी मागणी असते. ही गरज लक्षात घेता‘नोगा’ने खासगी प्रक्रिया उद्योजकांच्या सहकार्यातून सीताफळावरील प्रक्रिया झालेल्या मालाचे विपणन करावे. यामुळे कोरडवाहू शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  custard apple processing project
  • सीताफळ प्रक्रिया उद्योगाला चालना मिळावी याकरिता उत्पादक शेतकरी, प्रक्रिया उद्योजक आणि खरेदीदार यांची साखळी तयार करण्यासाठी‘नोगा’ने पुढाकार घ्यावा, असे कृषिमंत्र्यांनी सांगितले. ‘नोगा’च्या माध्यमातून देवगड आंबा उत्पादक संघासोबत करार करण्यात येणार असून, त्याद्वारे हापूस आंब्याचा पल्प उपलब्ध होण्यास मदत होणार आहे, असे त्यांनी सांगितले.
  • गवती चहापासून तेल तयार करून त्याचा वापर फिनाईल तसेच स्वच्छतेसाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनांमध्ये केला जातो. त्यामुळे गवती चहाच्या कच्च्या मालाला मोठी मागणी आहे. हे पाहता राज्यातील शेतकऱ्यांना गवती चहा लागवडीसाठी प्रोत्साहीत करावे. त्यांच्या मालाची खरेदी होईल, अशी शाश्वती मिळाल्यास शेतकरी गवती चहाच्या लागवडीकडे वळतील, असे कृषी मंत्र्यांनी सांगितले.