नवी मुंबई परिसरात विजेच्या कडकडाटासह पाऊस

हवेत गारवा, अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची धावपळ  

नवी मुंबई, 12 मे 2017/AV News Bureau:

उकाड्याने हैराण झालेल्या नवी मुंबईकरांना सायंकाळी अचानक आलेल्या पावसाने सुखद गारव्याचा अनुभव दिला. मात्र विजेच्या गडगडाटासह जोरात बरसणाऱ्या पावसाने मात्र नागरिकांची चांगलीच तारांबळ उडवली. नवी मुंबई परिसरात 2.6 मि.मी पावसाची नोंद झाली असून 8 ते 10 ठिकाणी झाडे कोसळल्याची माहिती आप्तकालीन विभागाने दिली.

गेल्या काही दिवसांपासून तापमानात चांगलीच वाढ झाल्यामुळे नागरिक चागंलेच हैराण झाले आहेत. अंगातून वाहणाऱ्या घामाच्या धारांमुळे लोकांना पावसाच्या धारांची आठवण होवू लागली आहे. हवामान खात्यानेही मान्सून लवकरच दाखल होण्याची आशा व्यक्त केल्यामुळे पावसाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यातच आज सायंकाळच्या सुमारास  आकाशात काळे ढग जमा होण्यास सुरूवात झाली होती. त्यामुळे पाऊस पडणार असे चित्र दिसत होते. सायंकाळी 7.30 पासूनच विजांच्या कडकडाटासह जोरदार सोसाट्याचा वारा वाहू लागल्यामुळे गारवा निर्माण झाला होता. त्यानंतर विजांच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी कोसळू लागल्यामुळे बच्चे कंपनी पावसात भिजू लागली. मात्र बेसावध असणाऱ्या नागरिकांना पावसाने वाटेतच गाठल्यामुळे अनेकांची चांगलीच तारांबळ उडाली. काहींनी पावसात भिजणे पंसत केले तर काहींनी लगेचच दुकानांच्या ओसरीबाहेर आसरा घेतला.

आज गोव्यासह संपूर्ण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली होती. त्यानुसार पावसाने चांगलीच हजेरी लावली. पुढील काही दिवसांत दक्षणि कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.