शिक्षण विभागाच्या लिपिकास लाचप्रकरणी अटक

 ठाणे, 3 एप्रिल 2017/AV News Bureau:

शिक्षण संस्थेकडे प्राथमिक शाळेचा पुर्नमान्यता प्रस्ताव मंजुरीस पाठविण्यासाठी 4 हजारांची लाच स्वीकारताना भिवंडी महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील लिपिकास लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने आद रंगेहाथ पकडले. अविनाश बुदाजी वारघडे असे या लाच मागणाऱ्या लिपिकाचे नाव आहे.

भिवंडी येथील सहयोगी शिक्षण संस्थेच्या प्राथमिक शाळेचा पुर्नमान्यता प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवायचा होता. याबाबत शिक्षण विभागाचा लिपिक अविनाश बुदाजी वारघडे याच्याकडे विचारणा केली. तेव्हा संस्थेचा प्रस्ताव ठाणे येथे मंजुरीसाठी पाठविण्यासाठी 10 हजार रुपयांची लाच मागितली. त्यामुळे संस्थेने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी करून त्यानुसार आज सापळा लावण्यात आला. अविनाश बुदाजी वारघडे 4 हजार रुपयांचा पहिला हप्ता घेत असताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले. त्याच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस उपअधिक्षक बाळकृष्ण सावंत अधिक तपास करीत आहेत.