महाराष्ट्रासह 8 राज्यांत केंद्राची पथके तैनात

स्थानिक प्रशासनाबरोबर समन्वयाने काम करून वाढणा-या रूग्णसंख्येची कारणे शोधणार

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी 2021 :

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रार्दुभाव लक्षात घेवून महाराष्ट्रासह आठ राज्य आणि केंद्रशाशित प्रदेशांमध्ये केंद्रिय पथके तैनात करण्यात आली आहेत. कोरोना महामारीचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य उपाययोजनांमध्ये मदत म्हणून महाराष्ट्र, केरळ, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात, पंजाब, कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीरमध्ये  उच्चस्तरीय पथके तैनात करण्यात आली आहेत.

तीन-सदस्यांच्या बहु-शाखीय पथकांचे नेतृत्व आरोग्य मंत्रालयातील सहसचिव स्तरीय अधिकारी करत आहेत. ही पथके स्थानिक प्रशासनाबरोबर समन्वयाने काम करतील आणि कोरोनाच्या वाढणा-या रूग्णसंख्येची कारणे शोधतील. संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी आरोग्य प्रशासनाशी समन्वय साधतील. कोविड व्यवस्थापनात आतापर्यंत झालेली प्रगती कायम राहील हे सुनिश्चित करण्यासाठी संबंधित जिल्हा अधिकाऱ्यांबरोबर उद्भवणाऱ्या परिस्थितीचा नियमितपणे गंभीर आढावा घेण्याची सूचना राज्ये / केंद्र शासित प्रदेशांना करण्यात आली आहे.

केंद्राने महाराष्ट्र, केरळ, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात, पंजाब या राज्यांना आणि जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशाला  पत्र देखील लिहिले आहे. या राज्यांमध्ये आरटी-पीसीआर चाचण्यांचे प्रमाण कमी होत असून काही जिल्ह्यांमध्ये कोविड बधितांच्या संख्येत वाढ दिसून येत आहे.

केंद्रीय आरोग्य सचिवांनी लिहिलेल्या पत्रात पुढील बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे.

संक्रमण साखळी तोडण्यासाठी आक्रमक उपाययोजना करण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे आणि आत्तापर्यंत न सापडलेल्या रुग्णांचा शोध घेण्यासाठी आरटी-पीसीआर चाचणीत वाढ करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

या राज्यांना आरटी-पीसीआर आणि रॅपिड अँटीजेन चाचण्यांचे योग्य विभाजन करून प्रभावित जिल्ह्यांमध्ये चाचण्या वाढवण्याचा सल्ला देण्यात आला आहे

लक्षणे आढळलेल्या मात्र अँटीजेन चाचणी निगेटिव्ह आलेल्यांची आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्य करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

बाधित व्यक्तींना तातडीने अलगीकरण / रुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहे, तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन कोणत्याही विलंबाशिवाय त्यांचीही चाचणी करणे गरजेचे आहे.


  • इतरही बातम्यांचा मागोवा