नवी मुंबई महापालिकेचा संघ उपविजेता

अखिल भारतीय व्यावसायिक खो-खो स्पर्धेत दमदार कामगिरी

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 14 जून 2022

कर्नाटक राज्य खो- खो असोसिएशनच्या मान्यतेने काथनहळी, जिल्हा मंडया, कर्नाटक येथे 2 ते 5 जून  या कालावधीमध्ये पार पडलेल्या अखिल भारतीय निमंत्रित व्यावसायिक खो – खो स्पर्धेमध्ये नवी मुंबई महानगरपालिका खो-खो संघाने स्पर्धेचे उपविजेतेपद पटकाविले. वेस्टर्न रेल्वे संघासोबतच्या अंतिम सामन्यात अटीतटीच्या लढतीत नवी मुंबई महानगरपालिका संघ 3 गुणांनी पराभूत झाला.

या स्पर्धेमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेसह दक्षिण मध्य रेल्वे, मुंबई पोलीस, महाराष्ट्र राज्य विदयुत वितरण बोर्ड, भारतीय रिझर्व्ह बॅक, कर्नाटक राज्य संघ, वेस्टर्न रेल्वे, महाराष्ट्र राज्य पोलीस, बृहन्मुंबई महानगरपालिका, मध्य रेल्वे, प्रेसिडेंट इलेव्हन, कर्नाटक राज्य असे एकाहून एक बलाढय खो-खो संघ सहभागी होते.

या स्पर्धेत “अ” गटातून नवी मुंबई महानगरपालिका संघाने विजय मिळवीत “ब” गटातील उपविजेता संघ  मध्य रेल्वे सोबत उपांत्य फेरीचा सामना खेळला. यामध्ये मध्य रेल्वे संघाने पहिल्या डावात (मध्य पूर्व) नवी मुंबई महानगरपालिकेच्या संघाचे 11 गडी बाद करुन 3 गुणाची आघाडी घेतली होती. मात्र मध्यानंतर महानगरपालिका संघाने  मध्य रेल्वे संघाचे 11 गडी बाद केले तर मध्य रेल्वे संघाने 9 गडी बाद केले  त्यामुळे उपांत्य फेरीचा सामना नवी मुंबई महानगरपालिका संघाने 3 गडी राखून जिंकला व अंतिम फेरीत प्रवेश मिळविला.

या स्पर्धेतील अंतिम सामना नवी मुंबई महानगरपालिका आणि वेस्टर्न रेल्वे या दोन बलाढय संघांमध्ये झाला. या निकराच्या लढाईत वेस्टर्न रेल्वे हा संघ 3 गुणानी विजयी झाला. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका संघास या स्पर्धेचे व्दितीय क्रमांकाचे उपविजेतेपद प्राप्त झाले. संपूर्ण सामन्यामध्ये सर्वोत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केल्याबदल नवी मुंबई महानगरपालिका संघातील गजानन शेंगाळ या खेळाडूस 2 दिवस तसेच आकाश साळवे व लक्ष्मण गवस या खेळाडूंग त्या दिवसाचा मानकरी म्हणून वैयक्तिक पारितोषके देऊन गौरविण्यात आले.

संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट आक्रमक म्हणून नवी मुंबई महानगरपालिका संघातील अष्टपैलु खेळाडू गजानन शेंगाळ या खेळाडूस वैयक्तिक चषक व रोख पारितोषक देऊन गौरविण्यात आले.

अखिल भारतीय खो–खो स्पर्धेत नवी मुंबई महानगरपालिकेच्या संघाने उत्कृष्ट खेळ करून उज्वल यश संपादन केल्याबद्दल महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी संघातील खेळाडू व प्रशिक्षकांचे कौतुक करीत पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी क्रीडा विभागाचे उपआयुक्त मनोजकुमार महाले, क्रीडा अधिकारी रेव्वपा गुरव व प्रशिक्षक सिध्दाराम दहिवडे उपस्थित होते.
========================================================

  • मागील बातम्यांवरही दृष्टिक्षेप