कपिलवस्तू येथे असलेले भगवान बुद्धांचे चार पवित्र अवशेष 11 दिवसांच्या प्रदर्शनासाठी मंगोलियात पोहोचले

मंगोलियात उलानबातर येथे पोहोचल्यावर या अवशेषांचे अत्यंत आदरयुक्त आणि उत्सवी वातावरणात स्वागत

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी दिल्ली, 13 जून 2022

कपिलवस्तू येथे असलेले भगवान बुद्ध यांचे पवित्र अवशेष 11 दिवसांच्या प्रदर्शनात मांडण्यासाठी 13जून रोजी मंगोलिया येथे पोहोचले. केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री किरेन रिजीजू यांच्या नेतृत्वाखालील 25 सदस्यांचे एक प्रतिनिधीमंडळ या अवशेषांसोबत मंगोलिया येथे गेले आहे. अत्यंत आदरयुक्त आणि उत्सवी वातावरणात मंगोलियाच्या सांस्कृतिक मंत्री चे नॉमिन, भारत मंगोलिया मैत्री गटाच्या अध्यक्ष आणि खासदार सरनचीमेग, मंगोलियाच्या राष्ट्रपतींचे सल्लागार खांबा नोमून यांनी इतर मान्यवर तसेच मोठ्या संख्येने उपस्थित धर्मगुरू यांच्यासह उलानबातर आंतरराष्ट्रीय विमानतळावर या अवशेषांचा स्वीकार केला.

या प्रसंगी बोलताना, केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री किरेन रिजीजू म्हणाले की, या पवित्र अवशेषांचे भारतातून मंगोलिया येथे आगमन झाल्यामुळे या दोन्ही देशांदरम्यानचे ऐतिहासिक संबंध आणखी दृढ होतील. भारत एक प्रतिनिधी म्हणून भगवान बुद्धांचा संदेश जगापर्यंत पोहोचवीत आहे असेही त्यांनी सांगितले.

विमानतळावरून निघाल्यानंतर, प्रार्थना तसेच बौद्ध मंत्रोच्चारांच्या घोषात उत्सवी वातावरणात गंदन मठात या पवित्र अवशेषांचे स्वागत करण्यात आले. भगवान बुद्धांच्या पवित्र अवशेषांना आदरपूर्वक नमन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मंगोलियन लोक या ठिकाणी जमा झाले होते. मंगोलिया येथे Ephemtv आजपासून सुरु होणाऱ्या 11 दिवसांच्या प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर, हे पवित्र अवशेष सुरक्षितपणे जतन करण्यासाठी गंदन मठातील बौद्ध धर्मगुरूंच्या उपस्थितीत गंदन मठाच्या व्यवस्थापनाकडे सुपूर्द करण्यात आले.

नवी दिल्ली येथे काल संध्याकाळी पारंपरिक रितीरिवाज पूर्ण झाल्यानंतर या पवित्र अवशेषांना घेऊन केंद्रीय मंत्र्यांनी प्रतिनिधीमंडळासह भारतातून मंगोलियाला जाण्यासाठी प्रयाण केले. हे पवित्र अवशेष केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या राष्ट्रीय वस्तुसंग्रहालयात ठेवण्यात आलेल्या 22 विशेष अवशेषांच्या संग्रहाचा भाग आहेत.

===================================================

  • मागील बातम्यांवरही दृष्टिक्षेप