मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवरील टोलनाक्यांवर गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका

प्रतिकात्मक फोटो

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रशासनाला निर्देश

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, २९  ऑगस्ट २०२२

गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या वाहनांसाठी मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावरील टोलनाक्यांवर स्वतंत्र मार्गिका करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. साताऱ्याहून मुंबईकडे परतताना दुपारी पुण्यातील चांदणी चौक परिसराला भेट दिल्यानंतर त्यांनी मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावरील खोपोली (खालापूर) टोलनाक्याला भेट दिली. याठिकाणी अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत त्यांनी ह्या सूचना दिल्या.

मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावरील खोपोली (खालापूर) टोलनाक्यालाही मुख्यमंत्र्यांनी भेट दिली. या भागात होणाऱ्या वाहतूक कोंडीचा  त्यांनी आढावा घेतला.  गणेशोत्सव, शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या काळात याठिकाणी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी टोल नाक्यांवर ट्रॅफिक वॉर्डन  त्याचबरोबर टोल वसूल करण्यासाठी आवश्यक ते स्कॅनिंग मशिन्सची संख्या वाढवावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी महामार्ग पोलिस आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीत दिले.

सण-उत्सव, सुट्ट्यांच्या काळात या द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी आणि पथकर नाक्यावर होणारी गर्दी टाळण्यासाठी आवश्यक ते मनुष्यबळ वाढवावे. सीसीटीव्ही यंत्रणा सक्षम करण्याबरोबरच अपघात टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी  दिले.