शरीरसौष्ठवपटूंच्या पाठीशी पालिका कायम राहणार

मुंबई महापौरांचे संघटनेला आश्वासन

मुंबई, 12 एप्रिल 2017/AV News Bureau:

मुंबई महानगर पालिका नेहमीच शरीरसौष्ठव आणि शरीरसौष्ठवपटूंच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे आणि भविष्यातही राहील. मुंबईचे नाव देशात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावणाऱया गुणवान खेळाडूंच्या कर्तृत्वाची कदरही पालिका निश्चित घेईल असे आश्वासनही महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिले. येत्या 22 एप्रिलला होणाऱया प्रतिष्ठेच्या मुंबई महापौर श्री स्पर्धेच्या आयोजनासाठी महापौरांनी बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटनेला शुभेच्छाही दिल्या.

जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा 22 एप्रिलला लोअर परळ येथील ललित कला भवनात रंगणार आहे. आमदार सुनील शिंदे आणि शिवबा प्रतिष्ठानच्या सहकार्याने होत असलेल्या मुंबई महापौर श्री स्पर्धेच्या तयारी निमित्त शरीरसौष्ठव संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांची भेट घेतली.

या ग्लॅमरस खेळाला अपेक्षेपेक्षा कमी निधी मिळत असला तरी संघटना स्पर्धेच्या आयोजनात कोणतीही उणीव भासू देत नसल्याचे संघटनेचे अध्यक्ष अजय (नंदू) खानविलकर यांनी सांगितले. महापौरांनीही याची दखल घेत शरीरसौष्ठवावर मुंबई पालिकेचे प्रेम असेच कायम राहिल आणि भविष्यात स्पर्धा आयोजनात निधीची वाढ केली जाईल असे आश्वासन दिले.

  • तीन लाखांची बक्षीसे

मुंबई महापौर श्रीला महापौर निधीतून फार मोठा निधी मिळत नसला तरी संघटनेच्या पुढाकारामुळे आयोजनातून स्पर्धेची भव्यता दिसूनच येते. या स्पर्धेला किती निधी मिळतो त्यापेक्षा स्पर्धेत स्पर्धकांना लाखांची बक्षीसे मिळतात, याचीच अधिक चर्चा होते. या स्पर्धेत विजेता 51 हजारांचा मानकरी ठरणार तर सात गटांच्या या स्पर्धेत प्रत्येक गटात 30 हजारांची रोख बक्षीसे दिली जाणार आहे. गटविजेता 10 हजारांचा पुरस्कार जिंकेल तर अन्य चार क्रमांकांना 8, 6,4 आणि 2 हजारांचे रोख इनाम लाभेल. त्याचबरोबर बेस्ट पोझरलाही रोख पुरस्कार दिला जाईल. तब्बल तीन लाखांच्या बक्षीसांची उधळण या स्पधेत केली जाणार आहे.