अळंबीवर ‘ड’ जीवनसत्व तयार करण्याच्या प्रयोगाला यश

नवी मुंबईतील डॉ. अंजली पारसनिस यांच्या प्रयोगाला भारतीय पेटंट

  • स्वप्ना हरळकर /अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 7 फेब्रुवारी 2023

कार्बनाची संयुगे असलेली जीवनसत्व आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्वाची असतात. मात्र ती शरीरात तयार होत नाहीत तर ती आपल्याला आपल्या अन्नातून घ्यावी लागतात. त्यासाठी सर्व जीवनसत्व, प्रथिने यांचा समावेश असलेला पोषक आहार महत्वाचा मानला जातो. पण पोषक आहार घेवूनही काही जीवनसत्वांची विशेषतः ड जीवनसत्वाची कमतरता राहतेच.  मग आपण ही जीवनसत्व मिळविण्यासाठी औषधे, गोळ्या, टॉनिक यांचा वापर सुरू करतो. रासायनिक प्रक्रियेतून मिळणारे हेच ड जीवनसत्व जर आपल्या रोजच्या आहारातूनच नैसर्गिकरित्या मिळाले तर याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना होईल. असा विचार करून डॉ. अंजली पारसनिस आणि त्यांचा मुलगा निशांत पारसनिस यांनी अळंबीवर (मशरूम) ड जीवनसत्व तयार केले. या प्रयोगासाठी पारसनिस यांना भारतीय पेटंटही मिळाले आहे. तसेच या उत्पादनाला एफएसएसआयची नोंदणीही मिळाली आहे.

  • SWAPNA’S FOODTRACK YOUTUBE CHANNEL

काही वर्षांपूर्वी डॉ. अंजली पारसनिस यांना साधारण पाच सहा वर्षांपूर्वी ड जीवनसत्वाची कमतरता आढळून आली. त्याचे खूपच दुष्परिणाम जाणवू लागले होते. त्यातूनच मग ड जीवनसत्वाची कमतरता कशामुळे होते याचा त्यांनी शोध घ्यायला सुरूवात केली. ही कमतरता भरून काढण्यासाठी कोणते पर्याय आहेत का याची माहिती घेण्यास सुरुवात केली.  ड जीवनसत्वासाठी मांसाहारी खाण्यात पर्याय उपलब्ध आहेत मात्र शाकाहारी लोकांसाठी खूपच कमी पर्याय उपलब्ध असल्याचे लक्षात आले.

निसर्गात ड जीवनसत्व हे थंड प्रदेशातल्या सालमन, ट्राऊट अशा माशांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येते.  यासाठी काही भौगोलिक कारणेही कारणीभूत असू शकतात. हे मासे आपल्यात ड जीवनसत्व साठवून ठेवतात. आपल्याकडे उष्ण कटिबंधात आढळणाऱ्या माश्यांमध्ये हे प्रमाण कमी असते. दररोज तुम्हाला जर आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार ६०० युनिट एवढ्या प्रमाणात ड जीवनसत्व घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला असेल तर तुम्हाला एका दिवसाला १५ ते २० अंडी आहारात समाविष्ट करणे आवश्यक आहे. एवढ्या प्रमाणात अंडी खाणे सर्वांनाच  शक्य होत नाही. त्यामुळे मग यासाठी कोणता पर्याय उपलब्ध आहे याची माहिती घेण्यास सुरुवात केली. यासाठी परदेशात ड जीवनसत्वाचा कोणता पर्याय वापरला जातो याचा अभ्यास करतान पारसनिस यांच्या लक्षात आले की अमेरिकेत नागरिकांना ड जीवनसत्वाची कमतरता आढळून येते त्यामुळे तिथे संत्र्याच्या रसात आणि दूधातच ड जीवनसत्वाची मात्रा दिली जाते.  मात्र भारतात तसा पर्याय उपलब्ध नाही.

  • SWAPNA’S FOODTRACK YOUTUBE CHANNEL

भारतात आढळणाऱ्या मशरूम (अळंबी) आणि दगडफूल यामध्ये ड जीवनसत्वे मोठ्या प्रमाणात असतात असे अभ्यायादरम्यान आढळून आले. मात्र या दोघांचाही आपल्या आहारात फार मोठ्या प्रमाणावर समावेश नसतो. हे लक्षात आल्यानंतर डॉ. पारसनिस यांनी सामान्य माणसाला एक चमचा दिवसाला काही खाल्ले तर त्यातून ड जीवनसत्व मिळेल का याचा विचार करून तशा शोधाला सुरूवात केली.

सकाळच्या कोवळ्या उन्हात फिरलात तर तुम्हाला खूप जास्त प्रमाणात ड जीवनसत्व मिळते हा मोठा गैरसमज आहे. हा गैरसमज दूर होण्यासाठी डॉ. पारसनिस यांनी काही शेतकरी, मजूर, आदिवासी महिला यांची ड जीवनसत्वाची चाचणी केली. ही चाचणी या संपूर्ण प्रयोगात महत्वाची ठरली. उन्हात काम करणाऱ्या या सर्वांमध्ये मोठ्या प्रमाणात ड जीवनसत्वाची कमतरता आढळून आली. तेव्हा लक्षात आले की सूर्याच्या प्रकाशापेक्षाही ड जीवनसत्वासाठी काही महत्वाचे काही आहे ज्याचे सेवन करणे आवश्यक आहे.

भारतात ८० टक्क्यांहून अधिक लोकांना ड जीवनसत्वाची कमतरता आहे हे त्यावेळी लक्षात आले. त्यासाठी ड जीवनसत्वाचा मोठा साठा असणा-या अळंबी (मशरूम) वर प्रयोग करण्यास सुरू केले जवळपास सहा वर्षांच्या विविध प्रयोगांनंतर प्रयोगशाळेत मशरूमच्या सेल वाढवून त्यावर यूव्ही किरणांचा मारा करून मोठ्या प्रमाणात ड जीवनसत्वाची निर्मिती करता येणे शक्य झाले. उन्हाळ्यात घातलेल्या वाळवणांसारखीच ही पध्दत असते मात्र ती संपूर्ण शास्त्रीय पध्दतीने आणि प्रयोगशाळेत सर्व प्रकारचे नियम पाळून केली जाते.

मग आपल्या रोजच्या आहारातील गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी या धान्यांवर हे मशरूम सेल वाढविण्यासाठी सुरूवात केली. या धान्याच्या दोन दाण्यावर ड जीवनसत्वे मोठ्या प्रमाणात तयार होतील यासाठी प्रयोग केले गेले आणि ते यशस्वी झाले. रोजच्या आहारातली ही धान्ये ड जीवनसत्वाचा सोर्स बनल्यामुळे याचे भारतीय पेटेंटही पारसनिस यांना मिळाले.

ठाण्यातील मुकुंद जोशी यांनी या दाण्याचा प्रयोग करण्यास मान्यता दिली. त्यांचे १६ नॅनोग्रॅम एमएल पर्यंत ड जीवनसत्व कमी झाले होते. त्यांनी दररोज हे दोन दाणे खाण्यास सुरूवात केली. अवघ्या २५ दिवसात त्यांचे ड जीवनसत्वाचे प्रमाण  २६ नॅनोग्रॅम पर्यंत वाढले. त्यांच्या जीवनसत्वाच्या प्रमाणात जवळपास ५० टक्के वाढ झाली.

दिवसाला साधारण ६०० युनिट ड जीवनसत्वाची गरज आपल्या शरिराला असते त्यातले अश्या पध्दतीने जवळपास ४०० युनिटपर्यंत देता येतात. भारतात हजार दीड हजार युनिटची गरज आहे तार बाकी काही सोर्स नसल्याचे अंजली पारसनिस सांगतात.

१६ वर्ष टेरीमध्ये रिजनल डिरेक्टर म्हणून काम करणा-या अंजली पारसनिस यांनी या प्रकल्पासाठी नोकरी सोडली. आयआयटी मुंबईत हा प्रकल्प साकारत आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या निधी प्रयास या प्रकल्पांतर्गत हा प्रकल्प उभा करण्यासाठी आर्थिक मदत मिळाल्याने सर्वसामान्य नागरिकांना परवडेल अशा दरात ड जीवनसत्वाची कमतरता पूर्ण करणारे हे उत्पाद तयार करू शकल्याचे अंजली पारसनिस सांगतात.

  • पिठात १० ग्रॅम दाण्यांचा समावेश

दळण दळताना १ किलोमागे १० ग्रॅम दाणे त्यात टाकले तर संपूर्ण कुटुंबालाच ड जीवनसत्व मिळत राहील. केवळ धान्यातच नव्हे तर पीठाशी संबंधित केक, लाडू, पिठलं यांसारख्या अन्नपदार्थातही याचा समावेश करता येवू शकतो. प्रयोगशाळेत एका दाण्यात किती प्रमाणात ड जीवनसत्व आहे याची चाचणी केलेली असते त्यानुसार हे प्रमाण ठरलेले आहे.

========================================================

  • अविरत वाटचाल YOUTUBE CHANNEL

========================================================

  • अविरत वाटचाल वर्तमानपत्र