राष्ट्रवादीच्या प्रचारासाठी सुप्रिया सुळे मैदानात  

उदयापासून मुंबई महापालिका निवडणुक प्रचाराची सुरूवात

मुंबई,16 जानेवारी 2017/ AV News Bureau :

मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी होणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने एकट्याने लढाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार खासदार सुप्रिया सुळे या मैदानात उतरल्या असून 17 जानेवारीपासून त्या पक्षाच्या प्रचार मोहिमेला सुरूवात करणार आहेत. परळ येथील राष्ट्रीय मिल मजदूर संघातील महिला कार्यकर्ता मेळाव्यापासून प्रचार सुरू होणार आहे. त्यानंतर पुढील तीन दिवस उत्तर पश्चिम, उत्तर मध्ये आणि उत्तर मुंबई या जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या यादीतील उमेदवारांच्या निवडणुक कार्यालयांचे त्यांच्या हस्ते उदघाटन केले जाणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडीची चर्चा सुरू असतानाच तब्बल पंचेचाळीस उमेदवारांची पहिली यादी जाहीर करत निवडणुकीसाठी आपण तयार असल्याचे स्पष्ट केले. आता काँग्रेससोबत आघाडी होणार नसल्याचे संकेत मिळाल्यानंतर प्रचाराचा नारळही आधी फोडून प्रचारातही आघाडी घेतली आहे.

मुंबई महापालिकेतील रस्ते घोटाळा,नालेसफाई घोटाळा, टॅब घोटाळा यासारख्या मुद्द्यांवर मेळाव्यातील आपल्या भाषणादरम्यान सुप्रिया सुळे काय भाष्य करणार याबाबत उत्सुकता आहे.