सॅनिटरी पॅडचे विघटन करणारे मशीन मंत्रालयात

मुंबई ,5 मार्च 2018/ अविरत वाटचाल न्यूज:

सॅनिटरी नॅपकीनचे विघटन करणारी इनसिनिरेटर मशीन आज मंत्रालयात बसविण्यात आली. मंत्रालयातील विस्तारीत इमारतीमधील 4 थ्या आणि 5 व्या मजल्यावर बसविण्यात आल्या आहेत.

निर्मल रक्षा अभियान प्रकल्प अंतर्गत सिल्वरेज युटोपीअन कंपनी प्रा. लि. ने ही मशिन दिली आहे. या मशिनने वापरलेल्या नॅपकिनपासून पर्यावरण, सार्वजनिक आरोग्य तसेच स्वच्छता कर्मचारी यांचे वैयक्तिक आरोग्य यांना होणारा धोका विचारात घेता आधुनिक पद्धतीने पर्यावरण पुरक ईनसीनिरेटर पद्धतीचा वापर करून नष्ट करण्यासाठी अत्याधुनिक इनसिनिरेटर मशीन मंत्रालयात प्रायोगिक तत्वावर बसविण्यात आले आहे, असे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले.

८ मार्च या जागतिक महिला दिनानिमित्त शासनाच्या वतीने अस्मिता योजनेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. अस्मिता योजनेतून जिल्हा परिषद शाळांमधील 11 ते 19 वयोगटातील किशोरवयीन मुलींना 5 रुपयांत ८ सॅनिटरी नॅपकीनचे पाकीट मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात 7 लाख मुलींना याचा लाभ देण्यात येणार आहे. त्यामुळे सॅनिटरी नॅपकीन मोठ्या प्रमाणात वापरले जाणार आहेत. आरोग्याच्या दृष्टीने सॅनिटरी नॅपकीन विघटन करणे आवश्यक असल्याने अशा मशीन व अशा तंत्रज्ञानाचे परीक्षण करण्यासाठी या मशीन सुरूवातीला मंत्रालयात बसविण्यात आल्या आहेत.

अस्मिता योजनेस उत्तम प्रतिसाद मिळत असून इनसिनिरेटर मशीनचे जास्त लोकसंख्या असणाऱ्या भागात सीएसआरच्या माध्यमातून  बसविण्यात येणार असल्याचे सांगून सॅनिटरी नॅपकीन विघटन करण्यासाठीच्या अनेक प्रकारच्या तंत्रज्ञानाच्या मशीन परिक्षणासाठी वापरण्यात येणार आहेत. यामध्ये विद्युतविना चालणाऱ्या मशीनचा समावेश केला जाणार आहे, असेही मुंडे यांनी सांगितले.

सिल्वरेज युटोपीअन कंपनी प्रा. लि. या कंपनीने अहमदनगर, नागपूर, पुणे या ठिकाणी इनसिनिरेटर मशीन मोफत बसून दिल्या आहेत. राज्यात विविध ठिकाणी निर्मल रक्षा अभियानांतर्गत ही कंपनी काम करीत आहे,असेही मुंडे यांनी सांगितले.