राज्यातील प्रश्नांबाबत केंद्राकडे पाठपुरावा करावा

केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी बैठकीत  मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई, 27 जानेवारी 2017/AV News Bureau:

राज्यातील रेल्वे उड्डाण पुलांचे प्रस्ताव तसेच रस्ते, पाणी, नगरविकासाचे प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर केले आहेत. या प्रस्तावांसंदर्भात खासदारांनी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.

केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी महाराष्ट्रातील विविध प्रश्नांसंदर्भात चर्चा करण्यासाठी राज्यातील खासदारांची बैठक येथील सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. त्यावेळी मुख्यमंत्री  फडणवीस बोलत होते. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्यासह खासदार व विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव उपस्थित होते.

राज्याच्या महत्वाच्या प्रश्नांवर केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्याची भूमिका सर्व खासदारांनी दाखवली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. खासदारांनी मांडलेल्या विविध मुद्यांबाबत राज्य शासनाशी संबंधित जे मुद्दे आहेत ते तातडीने निकाली काढण्यासाठी संबंधितांना निर्देश देण्यात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांंगितले.

यावेळी खासदार सर्वश्री चिंतामण वनगा, रामदास तडस, माजिद मेमन, अनिल शिरोळे, नरेंद्र जाधव, ए.टी. पाटील, रक्षा खडसे, डॉ. विकास महात्मे, गोपाळ शेट्टी, प्रीतम मुंडे, संजय काकडे, राजीव सातव,  संभाजी राजे छत्रपती , कपिल पाटील, रावसाहेब दानवे, पूनम महाजन, दिलीप गांधी, डॉ. हिना गावित व अमर साबळे यांनी राज्याच्या विविध प्रश्नांवर उहापोह केला.