महाराष्ट्रापेक्षा दिल्लीत विजेचे दर कमी

दिल्लीत सबसिडीमुळे कमी दर असल्याचे महावितरणचे स्पष्टीकरण

मुंबई, दि. 18 फेब्रुवारी 2017/AV News Bureau:

दिल्लीच्या तुलनेत महाराष्ट्रात महावितरणचे वीजदर वाजवीच असून दिल्ली येथील नियामक आयोगाने घरगुती ग्राहकांना 0 ते  200 युनिटपर्यंत प्रतियुनिट 4 रुपये तर 201 ते 400 युनिटपर्यंत प्रतियुनिट 5 रुपये 95 पैसे असा वीजदर निश्चित केला आहे. दिल्ली सरकारने वीजदरात मोठ्या प्रमाणात सबसिडी दिल्यामुळेच घरगुती ग्राहकांनी भरावयाचे वीजदर कमी झाले आहेत,असे स्पष्टीकरण आज महावितरणने दिले आहे.

दिल्लीपेक्षा महाराष्ट्रात विजेचे दर जास्त आहेत हे म्हणणे संयुक्तिक नाही. महावितरणने वीजदेयकात स्वतंत्रपणे लावलेल्या वहन आकारामुळे वीजदरात कुठलीही वाढ झालेली नाही, असे यापूर्वीच स्पष्ट करण्यात आल्याचेही महावितरणने म्हटले आहे.

  • सबसिडीमुळे दिल्लीत वीज स्वस्त

महावितरणच्या तुलनेत दिल्लीमधील वीजदर कमी आहेत, अशा प्रध्दतीचा अपप्रचार विविध माध्यमांतून केला जात आहे.  परंतु दिल्लीमध्ये तेथील शासनाने 200युनिटपर्यन्त प्रतियुक्त 2 रुपये तर 201 ते 400 युनिटच्या वापरापर्यन्त प्रतियुनिट 2 रुपये 97 पैसे अशी सबसिडी ग्राहकांना दिली आहे.  परिणामी दिल्लीतील घरगुती ग्राहकांनीभरावयाचे वीजदर हे कमी झाले आहेत.

  • महावितरणचे म्हणणे

वीजदर निश्चित करण्याचे अधिकार महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग यांना आहेत. महावितरणला यात बदल करण्याचे कुठलेही अधिकार नाहीत.  26 जून 2015च्या आदेशापर्यंत वीजबिलात स्थिर आकार आणि अस्थिर आकार असे दोन भाग होते.  वीज आकार व वहन आकार हे पूर्वीच्या अस्थिर आकाराचे भाग आहेत. परंतु आयोगाच्या 3 नोव्हेंबर 2016 च्या आदेशानुसार आता वीजबिलात स्थिर आकार, वीज आकार व वहन आकाराचा समावेश करण्यात आला आहे.  त्यामुळे वहन आकार हा नवीन आकार नसून वीज बिलाचाच भाग आहे. म्हणून वहन आकार लागू केल्याने वीजदरात वाढ झालेली नाही.