फूटबॉल वर्ल्ड कपसाठी 6 ठिकाणी पार्किंग

  • नवी मुंबईत 13 हजार वाहनाच्या पार्किंग व्यवस्थेचे नियोजन

 20 सप्टेंबर 2017 / AV News Bureau:

ऑक्टोबर महिन्यात नेरूळ येथील डॉ.डी.वाय. पाटील स्टेडिअम मध्ये ‘अंडर 17 वर्ल्ड कप इंडिया 2017’ चे सामने खेळवले जाणार आहेत. या सामन्यांसाठी येणा-या क्रीडा प्रेमींसाठी पर्यायी वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. नेरूळ, खारघर अशा 6 ठिकाणी 13 हजार वाहने उभी राहतील अशी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणांहून स्टेडिअमपर्यंत पोहोचण्यासाठी नवी मुंबई परिवहन सेवेच्या बसेसची सोय करण्यात आली आहे.

 06, 09, 12, 18 व 25 ऑक्टोबर या दिवशी नेरुळ, नवी मुंबई येथील डॉ. डी.वाय.पाटील स्टेडियममध्ये एकूण 8 सामने होणार असून यावेळी देशापरदेशातून मोठ्या संख्येने येणा-या क्रीडा रसिकांसाठी वाहतुक व्यवस्थेच्या नियोजनावर विशेष लक्ष देण्यात आले आहे. नवी मुंबई महानगरपालिका आणि नवी मुंबई वाहतुक पोलीस विभाग यांनी संयुक्तरित्या पाहणी करून वाहनतळाच्या जागा निश्चित केल्या असून खालील जागांच्या ठिकाणी पार्किंगसाठी नियोजन करण्यात येत आहे.

  •  ग्रॅँड सेंट्रल मॉल सिवूड, सेक्टर 40, नेरुळ
  • सायन पनवेल महामार्गावर एम.आय.डी.सी. बाजूकडील रहेजा युनिव्हर्सलची जागा नेरुळ,
  •  सिवूड स्टेशन जवळील गणपतशेठ तांडेल मैदान,
  • करावे गावाजवळील श्रीगणेश तलावाजवळील जागा,
  • उरण फाट्याजवळ प्लॉट नं. 8 ए, 8 बी, 13 बी ची मोकळी जागा,
  • त्याचप्रमाणे लिटील वंडर मॉल, खारघर  

 पार्किंगच्या निश्चित केलेल्या जागांवरुन सामने बघण्यासाठी स्टेडियमपर्यंत जाण्याकरीता एन.एम.एम.टी मार्फत वातानुकूलित व साध्या बसेसची अल्प दरात व्यवस्था करण्यात आली असून स्टेडियमच्या जवळील रेल्वे स्टेशन, बसडेपो येथूनही बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

नवी मुबंईत होणा-या या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी येणा-या खेळाडू आणि क्रीडा रसिकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याबाबत संपूर्ण काळजी नवी मुंबई महानगरपालिका व सर्वच प्राधिकरणांमार्फत घेण्यात येत असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी दिली आहे.