रामनाथ मोते यांना आमदार बच्चू कडू यांचा पाठिंबा

नवी मुंबई , 30 जानेवारी 2017/AV News Bureau:

कोकण शिक्षक मतदार संघातील निवडणुकीत अपक्ष म्हणून उभे असलेल्या व दोन वेळा या मतदार संघातून निवडून गेलेल्या आमदार रामनाथ मोते यांना आ. बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाने पाठिंबा दर्शविला आहे.

आमदार कडू यांनी यासंदर्भात एका पत्राद्वारे हा पाठिंबा जाहीर केला आहे. मोतेसारख्या अभ्यासू, निस्वार्थी आणि स्वत:चे आयुष्य वाहून घेणाऱ्या आमदारांचीच विधानपरिषदेत गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सत्ता आणि पैशाच्या जोरावर  शिक्षक मतदार संघाची ही निवडणूक भाजपासोबत इतर पक्षानेही राजकीय आखाडा बनविल्याचा आरोपही आमदार बच्चू कडू यांनी केला आहे.

कोकणातील शिक्षकांना रामनाथ दादा मोते यांच्यासारखेच उमेदवार न्याय देऊ शकतात, याची जाणीव आम्हाला असल्याने आमच्या संघटनेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने या निवडणुकीत शिक्षकांच्या हक्कासाठी उतरावे असे आदेश आ. कडू यांनी दिल्याची माहिती कोकण विभागीय अध्यक्ष संतोष गवस यांनी दिली.

सत्ताधारी भाजपाने सत्तेत आल्यापासून शिक्षकांच्या विरोधातच निर्णय घेऊन मराठी माध्यमांच्या शाळा बंद करण्याचे धोरण राबविले, शेकडो शिक्षकांना अतिरिक्त ठरविण्यासाठी कायदेही धाब्यावर बसवल्याने हजारो शिक्षक रस्त्यावर आले असून त्याची किंमत या सरकारला या निवडणुकीत मोजावी लागणार असून त्यासाठी आमदार बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली कोकणातील प्रत्येक जिल्ह्यात आमची संघटना अपक्ष उमेदवार रामनाथ दादा मोते यांच्या पाठिशी उभे राहणार असल्याचेही गवस यांनी स्पष्ट केले.