आज परीक्षा, परवा निकाल

मुंबई,21 फेब्रुवारी 2017/AV News Bureau:

राज्यातील 10 महानगरपालिका आणि दुसऱ्या टप्प्यातील 11 जिल्हापरिषदा व त्यांतर्गतच्या 118 पंचायत समित्यांसाठी आज मतदान होणार आहे. 3 कोटी 77 लाख 60 हजार 812 मतदार 17 हजार 331 उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. या   निवडणकांसाठी संपूर्ण निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून 2 लाख 73 हजार 859 कर्मचाऱ्यांसह पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. युती, आघाड्या विस्कटल्यामुळे अतिशय चुरशीच्या ठरणाऱ्या या निवडणुकीत मतदार राजाचा कौल आज मतपेटीत बंदीस्त होणार असून कुठल्या पक्षाला पसंतीची पावती मिळणार हे 23 फेब्रुवारीला कळेल.

  • दुसऱ्या टप्प्यातील मतदान

पहिल्या टप्प्यात 15 जिल्हा परिषदा आणि 165 पंचायत समित्या निवडणुकांसाठी 16 फेब्रुवारी रोजी मतदान झाले. दुसऱ्या टप्प्यात मुंबई, ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नाशिक, अकोला, अमरावती आणि नागपूर या १० महानगरपालिकांसह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अमरावती, वर्धा, यवतमाळ आणि गडचिरोली या जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत पंचायत समित्यांच्या
3 हजार 210 जागांसाठी आज निवडणूक होत आहे.

  • जागा आणि उमेदवार

महानगरपालिकांच्या 1 हजार 268 जागांसाठी 9 हजार 208 उमेदवार रिंगणात आहेत. जिल्हा परिषदेच्या 654 जागांसाठी 2 हजार 956, तर पंचायत समित्यांच्या 1 हजार 288 जागांसाठी 5 हजार 167 उमेदवारांमध्ये लढत होत आहे.

  • मतदानासाठी तयारी

43 हजार 160 मतदान केंद्रांची, तसेच 68 हजार 943 कंट्रोल युनिट व 1 लाख 22 हजार 431 बॅलेट युनिटसह यंत्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.

  • सुरळीत मतदानासाठी उपाययोजना

मतदान शांततेत व सुरळीतपणे पार पडावे यासाठी 54 हजार 25 जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून 371 जणांना तडीपार करण्यात आले आहे. 9700 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून आचारसंहिता भंगाचे 338 गुन्हे दाखल करण्यात आले आहे. 211 अवैध शस्त्रे, 6 लाख 81 हजार 980 लिटर अवैध दारु, तर 75 लाख 66 हजार 980 रुपयांची रोकड जप्त केली आहे, अशी माहितीही सहारिया यांनी पत्रकार परिषदेत दिली.