पनवेल महापालिकेची निवडणूक जूनमध्ये घ्या

भाजपचे मुख्य निवडणूक आयुक्तांना निवेदन

मुंबई, 31 मार्च 2017 /AV News Bureau:

प्रथमच होणाऱ्या पनवेल महापालिकेची निवडणूक जून महिन्यात घ्यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश भाजपने राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांच्याकडे केली आहे. याबाबतचे निवेदन भाजपतर्फे आज निवडणूक आयुक्तांना देण्यात आले.

प्रारुप मतदार याद्यांतील घोळामुळे पनवेल महापालिकेच्या निवडणुकीबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. प्रभागनिहाय मतदार याद्यांनुसार संबंधित मतदारांना महिती देण्यासाठी पुरेसा कालावधी आवश्यक आहे. त्याचप्रमाणे मतदार जागृतीसाठी निवडणूक आयोगाची यंत्रणा आणि राजकीय कार्यकर्त्यांना पुरेसा वेळ मिळावा यासाठी निवडणूक जून महिन्यात घ्यावी, अशी विनंती करणारे निवेदन प्रदेश भाजपच्यावतीने मुख्य प्रवक्ते माधाव भंडारी, आ. प्रशांत ठाकूर, आ.नरेंद्र पवार आदींनी मुख्य निवडणूक आयुक्तांना दिले.

पनवेल शहरात बाहेरून विशेषतः पश्चिम महाराष्ट्रासह गुजरात, उत्तर प्रदेश आणि इतर भागातून आलेले नागरिक मोठ्या प्रमाणात वास्तव्य करतात. सुट्टीच्या काळात ही मंडळी आपापल्या गावी जातात. त्यामुळे मे महिन्यात निवडणूक झाल्यास बाहेरगावी जाणारा मोठा वर्ग मतदानापासून वंचित राहण्याची भिती  भाजपच्या नेत्यांनी व्यक्त केली.

त्याचप्रमाणे सध्या राज्यात उष्णतेची लाट आहे. त्यामुळे मे महिन्यात निवडणूक झाली तर त्याचाही मतदानावर परिणाम होईल, या सर्व बाबी लक्षात घेवून जून महिन्यात झाल्यास उपयुक्त ठरेल, असे भाजप नेत्यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना सांगितले.