किती शेतकऱ्यांच्या आत्महत्यानंतर कर्जमाफी करणार ?

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा सरकारला सवाल

हिंगोली / वाशिम दिनांक ३१ मार्च २०१७/AV News Bureau:

भाजप सरकारच्या काळात ९ हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. तरी मुख्यमंत्री म्हणतात कर्जमाफीची ‘योग्य वेळ’ आलेली नाही. नेमक्या  किती शेतक-यांनी आत्महत्या केल्यावर कर्जमाफीची योग्य वेळ ये़णार आहे? असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सरकारला केला आहे.

शेतकरी कर्जमाफीसाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी काढलेली संघर्ष यात्रा आज मराठवाडय़ात दाखल झाली. हिंगोली येथील जाहीर सभेत बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. राज्याच्या विविध भागात रोज शेतकरी आत्महत्या करीत आहेत. पण सरकार शेतक-यांना दिलासा देण्यासाठी काहीच करत नाही.  २०१३ साली आमच्या सरकारच्या काळात प्रचंड दुष्काळी परिस्थिती होती. त्यावेळी आम्ही १० लाख जनावरे चारा छावणीत सांभाळली. शेतक-यांसाठी राज्याची तिजोरी उघडी केली होती. भाजप सरकारने उद्योगपतींची १ लाख १७ हजार कोटींची कर्ज माफ केली, पण शेतक-यांचे ३० हजार कोटी रूपयांचे कर्ज हे सरकार माफ करत नाही. शेतक-यांना मदत करण्याची या सरकारची दानत नाही असे चव्हाण म्हणाले.

यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांनी सरकारवर जोरदार टीका केली.

दरम्यान, आज तिस-या दिवशी संघर्ष यात्रा विदर्भातील सहा जिल्ह्यातून मार्गक्रमण केल्यानंतर हिंगोलीमार्गे मराठवाड्यात दाखल झाली. मराठवाड्यात सात जिल्ह्यात प्रवास करून ही यात्रा पश्चिम महाराष्ट्रात जाणार आहे. या संघर्ष यात्रेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, समाजवादी पक्ष, पिपल्स रिपब्लीकन पार्टी एमआयएम आदी  विरोधी पक्षांचे  नेते सहभागी झाले आहेत.