कॉंग्रेसकडून नेरूळमध्ये मतदार घरभेटीवर भर

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 8 मे 2024:

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्यासाठी 20  मे रोजी मतदान होणार आहे. या मतदानासाठी ठाणे लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर राजन विचारे यांनी आपला प्रचार जोमाने सुरू केला आहे.

महाविकास आघाडीचा घटक पक्ष असणा-या कॉंग्रेस पक्षाच्यावतीनेही विचारे यांचा प्रचार जोमाने करण्यात येत आहे. सध्याच्या डिजीटल युगात सामाजिक माध्यमांसोबतच कार्यकर्ते आणि पदाधिका-यांकडून प्रत्यक्ष गृहभेटिवरही भर दिला जात आहे. त्यानुसार कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हा प्रवक्ते व कामगार नेते रविंद्र सावंत तसेच कॉंग्रेसच्या नवी मुंबई जिल्हा सचिव विद्या भांडेकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते आणि पदाधिका-यांनी मतदारांशी थेट संवाद साधण्यास सुरूवात केली आहे. नेरूळमध्ये प्रचारात मुसंडी मारत प्रत्येक घराला भेट देवून मतदारांशी थेट संवाद साधण्यावर भर दिला जात आहे.

माजी खासदार डॉ. संजीव नाईक यांना तिकीट न मिळाल्याने एकीकडे भाजपा पदाधिकाऱ्यांकडून नाराजीचा सूर आळविला जात असताना दुसरीकडे कॉंग्रेसने आघाडीचा धर्म प्रत्यक्ष कृतीतून निभावण्यास सुरुवात केली आहे.

रविंद्र सावंत आणि विद्या भांडेकर यांच्याकडून मतदार घर भेटीदरम्यान महाआघाडीचे उमेदवार राजन विचारे यांचे निवडणुक चिन्ह, क्रमांक मतदारांना सांगण्यावर भर दिला जात आहे. तसेच मतदान करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे त्यामुळे मतदान करा असा सल्लाही कार्यकर्ते मतदारांना देत आहेत.

========================================================


========================================================