किमान वेतनाच्या अंमलबजावणीसाठी ‘वेबपोर्टल’

मुंबई,15 मे 2017/AV News Bureau:

राज्यातील संघटित, असंघटित कामगारच्या तक्रार नोंदणी आणि किमान वेतनाच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारतर्फे लवकरच एक ऑनलाइन वेबपोर्टल सुरु करण्यात येणार असल्याची माहिती कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी आज दिली.

यासंदर्भात मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती.या बैठकीला कामगार विभागाचे आयुक्त वाय. ई. केरुरे, कामगार उपसचिव श्रीमती भरोसे,  मुंबई घरेलू कामगार संघाचे अध्यक्ष अँड. अनिल घुमणे, भारतीय मजदूर संघाचे अध्यक्ष चंद्रकांत धुमाळ, महाराष्ट्राचे सर्व प्रांत पदाधिकारी आणि कामगार विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्रातील कोणत्याही भागातील कामगार विषयक तक्रार नोंदवण्यासाठी आणि त्याच्या किमान वेतनाचा हक्क त्यांना प्राप्त करून देण्यासाठी एका वेबपोर्टलची निर्मिती करण्यात येईल. या वेबपोर्टल मध्ये तक्रार करणाऱ्या कामगारांच्या अधिकारांना संरक्षण देण्यात येईल. तक्रार केलेल्या कामगाराला कामावरून आगाऊ सूचना न देता काढता येणार नाही, अशी तरतूद करण्यात येणार आहे, असे निलंगेकर यांनी सांगितले.

या सर्व तक्रारीचा साप्ताहिक अहवाल हा कामगार मंत्र्यांच्या कार्यालयाला द्यावा लागणार आहे. त्याची एक प्रत कामगार विभागाच्या प्रधान सचिवांना देण्यात येईल. या वेबपोर्टलच्या अंमलबजावणीसाठी एक समिती तयार करण्यात येणार आहे. त्यामध्ये कामगार विभागाचे आयुक्त हे प्रमुख असतील आणि विविध कामगार संघटनांचे प्रतिनिधीं असतील, असे निलंगेकर यावेळी म्हणाले.