पोस्टाद्वारे 1,236 जणांचे मतदान

स्वप्ना हरळकर/नवी मुंबई

27 मे 2017/AV News Bureau:

ज्या उमेदवाराला केवळ 1 मतामुळे पराभव स्वीकारावा लागतो. त्या उमेदवारालाच त्या एका मताचे मोल समजते. म्हणून निवडणुकीत प्रत्येक मत अतिशय महत्वाचे असते. त्यामुळेच  मतदानाच्या काळात जर कोणी शहराबाहेर अथवा आपल्या मतदारसंघात हजर नसेल तर उमेदवारांचा जीव टांगणीला लागतो. पनवेल महापालिकेची पहिली वहिली निवडणूक देखील उन्हाळी सुट्टीतच पार पडली. मात्र मात्र उन्हाळी सुट्ट्यांमुळे अनेक कुटुंबे बाहेर फिरायला वा आपल्या गावाला गेल्यामुळे अनेक उमेदवारांना चांगलीच धडकी भरली होती. एक एक मत पदरात पाडण्यासाठी प्रत्येक घराचे उंबरे झिझवणाऱ्या उमेदवारांना शहराबाहेर गेलेल्या आपल्या मतदारांची मते मिळणार नाही, अशी काहीशी भिती वाटत होती.  मात्र मतदान करणे हे आपले कर्तव्य आहे, असे मानणाऱ्या अनेक सुजाण मतदारांनी पनवेलमधील या उमेदवारांना दिलासा दिला आहे. मतदानाच्या वेळी बाहेरगावी असतानाही तब्बल 1236 मतदारांनी आपले मतदानाचे कर्तव्य पार पडले. विशेष म्हणजे टपालाद्वारे आलेल्या या मतांनी अनेक उमेदवारांच्या विजयाला हातभार लावला आहे.

प्रभाग क्रमांक 8 मध्ये 100 पेक्षा तर प्रभाग क्रमांक 17,18 मध्ये तर 200 आणि त्यापेक्षा अधिक मतदारांनी टपालाद्वारे मतदान करून आपले कर्तव्य पार पाडले आहे. जवळपास सर्व प्रभागांमध्ये टपालाद्वारे मतदान झाले आहे.

postal vote