अवैध मासेमारीविरोधात पोलिसांची समुद्रात गस्त

मुंबई, 20 ऑगस्ट 2017/AV News Bureau:

सिंधुदूर्ग तसेच कोकण विभागामध्ये पारंपरिक व यांत्रिकी पद्धतीने मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांमध्ये वारंवार वाद निर्माण होत आहेत. त्यामुळे मच्छिमारांचे हित जपण्यासाठी अवैध मासेमारी करणाऱ्यांविरोधात कारवाईसाठी पोलिसांची मदत देण्यात येईल, अशी माहिती गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांनी दिली.

मच्छिमारांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर आणि गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत शनिवारी बैठक घेण्यात आली. या बैठकीस प.दु.म. विभागाचे सचिव विकास देशमुख, मत्स्य व्यवसाय आयुक्त गोविंद बोडके आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

कोकण विभागात परराज्यातून येऊन मच्छीमारी केली जात असल्यामुळे स्थानिक पारंपरिक मच्छिमार तसेच यांत्रिकी पद्धतीने मासेमारी करणाऱ्या नौकाधारक मच्छिमारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यासाठी मत्स्य व्यवसाय विभागाला पोलीस दलाकडून आवश्यक ते सहाय्य दिले जाईल, असे केसरकर यांनी सांगितले.

  • परवानाधारक नौकांवर ‘व्हीटीएस’ प्रणाली

नौकेच्या प्रकारानुसार संबंधित नौकेने किती खोल समुद्रात मासेमारी करावी हे देखील निश्चित करण्यात आले आहे. परंतु तरीही काही नौकाधारक नियमबाह्य मासेमारी करतात. परिणामी, पारंपरिक तसेच यांत्रिकी पद्धतीने मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांचे नुकसान होते. अवैध मासेमारीला प्रतिबंध होण्याच्या दृष्टीने मासेमारी नौकांवर लक्ष ठेवता यावे यासाठी लवकरच सर्व परवानाधारक नौकांवर व्हेसेल ट्रॅकिंग सिस्टीम ‘व्हीटीएस’ प्रणाली बसविण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर ‘व्हीटीएस’ प्रणाली बसविण्यात येणार आहे. इतर सागरी जिल्ह्यांमध्ये व्हीटीएस प्रणाली बसविण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीमध्ये तरतूद करण्यासाठीचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवावेत, अशाही सूचना यावेळी करण्यात आल्या.